Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी दगडफेक, मद्यधुंद तरुणाकडून

•संजय शिरसाट म्हणाले: “माझं घर सर्वांसाठी उघडं… कार्यकर्त्यांनीच व्हिडिओ केला असावा”
छत्रपती संभाजीनगर | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील निवासस्थानी रविवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. सौरभ घुले नावाच्या एका मद्यधुंद तरुणाने त्यांच्या बंगल्यावर दगडफेक केली. यावेळी त्याने शिवीगाळही केली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत सदर तरुणाला ताब्यात घेतले असून, सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नशेत असल्यामुळे त्याचं वागणं आक्रस्ताळं झालं असण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे शिरसाट यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विशेष म्हणजे, संजय शिरसाट हे सध्या एका व्हिडिओ वादामुळेही चर्चेत आहेत. सदर व्हिडिओमध्ये ते त्यांच्या घरातील पलंगावर बसलेले असून, बाजूला पैशांनी भरलेली वाटावं अशी बॅग दिसते. विरोधकांनी यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं की, “ती बॅग कपड्यांची असून तो व्हिडिओ माझ्याच बेडरूममधील आहे. प्रवासातून आलो होतो, माझा श्वानही तिथेच फिरत होता,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
शिरसाट पुढे म्हणाले, “आमच्याकडे मातोश्री नाही. माझं घर मतदारसंघातील सर्वसामान्यांसाठी उघडं असतं. कुणी कार्यकर्ता उत्साहात असेल आणि त्यानेच तो व्हिडिओ काढला असावा.”दरम्यान, गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांच्या सुपुत्राच्या गाडीवरही दगडफेक झाली होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा हल्ल्याची घटना घडल्यामुळे सुरक्षेबाबतची चिंता व्यक्त होत आहे.



