क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbra Police Station : मुंब्रा पोलीस ठाण्यात 25 हजारांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक ‘रंगेहात’ जेरबंद

Thane ACB Latest Trap News : गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली होती 50 हजारांची लाच; तडजोडीअंती 25 हजार स्वीकारताना कारवाई

ठाणे :- मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) शशिकांत लक्ष्मण भालेराव (वय 49) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्याच्या नावाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भालेराव यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 25 हजार रुपयांवर निश्चित झाली. भालेराव यांनी 24 सप्टेंबर 2025 रोजी लाचेची ही मागणी केली होती.याबाबत तक्रारदाराने तातडीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 25 सप्टेंबर रोजी पडताळणी करण्यात आली असता, भालेराव यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

रंगेहात कारवाई

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी मुंब्रा पोलीस ठाण्यामधील रायटर कक्षामध्ये सापळा रचला. भालेराव तक्रारदाराकडून 25,000 रुपये स्वीकारत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक शिवगज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

एसीबीचे आवाहन

दरम्यान, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती किंवा तक्रार असल्यास त्यांनी विभागाशी तात्काळ संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0