मुंबईठाणे
Trending

Kedar Dighe : ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी शिनगारे यांचा सेवापूर्ती सोहळा वादात

Kedar Dighe Latest News : ‘निवृत्ती समारंभ राजकीय लोकांनी करणे म्हणजे हितसंबंधांचा भाग म्हणायचा का?’ केदार दिघे यांचा थेट सवाल

ठाणे :- ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे नियत वयोमानानुसार 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. दिघे Kedar Dighe यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या एका पोस्टमुळे हा सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

केदार दिघे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “वसई-विरार आयुक्तांचा निरोप समारंभ झाला आणि त्यांच्या संपत्तीचे घबाड ईडीला सापडले. मूळात आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे निरोप समारंभ राजकीय लोकांनी करणे म्हणजे हा त्यांच्या हितसंबंधांचा भाग म्हणायचा का? जिल्हाधिकारी ठाणे यांचाही निरोप समारंभ दिमाखात होणार आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी का?”

या पोस्टमुळे ठाण्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अशोक शिनगारे यांची ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यापासूनच ते चर्चेत होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांची निवड झाल्याचे बोलले जात होते. तर, त्यांचे आधीचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे व्याही असल्याने त्यांची बदली झाली होती, अशा चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या.

निवृत्तीपूर्वी शिनगारे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला होता, त्यावेळी ते भावुक झाले होते. गेल्या पावणे तीन वर्षांत वेळेअभावी पत्रकारांशी संवाद साधता आला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. आता त्यांच्या निरोप समारंभावरून सुरू झालेल्या या नव्या वादामुळे ठाण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0