
Navi Mumbai Police Bharti : पोलीस शिपाई, चालक आणि बॅण्डस्मन पदांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करा
नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police दलात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाने 2024-2025 या वर्षासाठी एकूण 527 विविध पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्याची अधिकृत माहिती दिली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पोलीस दलाच्या कार्यकक्षेत होणाऱ्या विस्तारानंतर ही भरती महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. Navi Mumbai Latest News
नवी मुंबई पोलीस दलाने जाहीर केलेल्या भरती प्रक्रियेनुसार, पोलीस शिपाईच्या 439 जागा, चालक पोलीस शिपाईच्या 82 जागा आणि बॅण्डस्मनच्या 06 जागा उपलब्ध आहेत. या सर्व 527 पदांसाठी पात्र उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज 30 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
सध्या नवी मुंबई पोलीस दलात सुमारे 4500 पोलीस कर्मचारी आणि 350 अधिकारी कार्यरत आहेत. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तीन पोलीस परिमंडळाची रचना केली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे स्वतंत्र विमानतळ पोलीस ठाणे आणि उलवा पोलीस ठाण्यांची निर्मिती झाली असून, अजून तीन पोलीस ठाण्यांचा विस्तार अपेक्षित आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पोलीस बळ वाढवावे लागणार असल्याने ही भरती प्रक्रिया सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
भरती प्रक्रियेविषयीची सर्व सविस्तर माहिती policerecruitment2025.mahait.org तसेच http://www.mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज सादर करावा लागणार आहे. पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक पात्रता निकष, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि इतर मार्गदर्शक सूचना संबंधित संकेतस्थळांवरून तपासून निर्धारित वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.


