
MNS On EC : ‘एक नगरसेवक, एक वॉर्ड’ पद्धतीची शिफारस; ‘मत चोरी’च्या वादामुळे मनसेही मैदानात
मुंबई :- देशभरात ‘मत चोरी’चा मुद्दा गाजत असतानाच आता मनसेनेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकतेसाठी कंबर कसली आहे. सोमवारी (11 ऑगस्ट) मनसेच्या एका शिष्टमंडळाने राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. यात प्रमुख मागणी ‘व्हीव्हीपॅट’ मशीनचा वापर करण्याची आहे, ज्याने मतदानात अधिक पारदर्शकता येईल, असे मनसेने म्हटले आहे.


मनसेचे नेते शिरीष सावंत, बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी दिलेल्या पत्रात एकूण चार प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने मुंबई वगळता इतर शहरांमध्ये ‘एक नगरसेवक, एक वॉर्ड’ अशी प्रभाग पद्धत लागू करावी, अशी मागणी केली आहे. सध्याच्या तीन किंवा चार नगरसेवकांच्या प्रभागामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना कार्यक्षमतेने काम करणे अवघड होत असल्याचा दावा मनसेने केला आहे.
मनसेने आपल्या पत्रात ‘डमी’ उमेदवारांच्या मुद्द्यावरही लक्ष वेधले आहे. सारखे नाव असलेल्या ‘डमी’ उमेदवारांमुळे मतदारांची दिशाभूल केली जाते, मात्र निवडणूक आयोग यावर कोणतीही कारवाई करत नाही, असे मनसेने म्हटले आहे. तसेच, प्रभाग रचना करताना सत्ताधारी पक्षांच्या प्रभावाखाली नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या भेटीनंतर मनसे नेते शिरीष सावंत म्हणाले, “आम्ही ‘व्हीव्हीपॅट’च्या वापरासाठी पुन्हा विचार करण्याची विनंती केली आहे. तसेच, दुबार मतदारांना वगळण्यासाठी आणि नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम तात्काळ सुरू करावा, अशी मागणीही केली आहे.” निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


