मुंबई

Supriya Sule : महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का! अधिवेशनात रमी प्रकरण दिल्ली दरबारी चर्चेत; सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

कृषीमंत्र्यांच्या कथित रमी व्हिडिओमुळे विरोधक आक्रमक; सुप्रिया सुळेंचा रोखठोक सवाल: “दिल्लीच्या हस्तक्षेपशिवाय महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही का?”

मुंबई :- महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाइलवर ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात जोरदार राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी कृषीमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या संदर्भात कारवाईचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीत इतर राज्यांचे खासदार आपल्याला थांबवून, “विधानसभेत रमी कोण खेळत होतं?” असे प्रश्न विचारत असल्याची खंत सुळे यांनी व्यक्त केली.

सुप्रिया सुळेंची खंत

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महाराष्ट्रामध्ये सध्या खूप मोठी अस्वस्थता आहे. राज्याची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बिघडलेली असून, गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यासमोर अनेक मोठी आव्हानं आहेत.” मुख्यमंत्री नुकतेच दोन-तीन दिवसांसाठी दिल्ली दौऱ्यावर होते आणि त्यांनीही सध्याच्या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे सुळे यांनी सांगितले. “भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून आमच्या कानावर काही गोष्टी आल्या आहेत, ज्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होईल अशी परिस्थिती आहे,” असे त्यांनी नमूद केले.

दिल्लीत इतर राज्यांचे खासदार आपल्याला भेटल्यावर रमी प्रकरणाबद्दल चौकशी करतात, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. “तुमच्या महाराष्ट्रात रमीचा काय प्रकार सुरू आहे? विधानसभेत कोण मंत्री रमी खेळत होतं?” असे प्रश्न मला विचारले जातात, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात कोणतीही घटना घडली तरी ती देशभरात चर्चेचा विषय ठरते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कंत्राटदारांच्या आत्महत्यांच्या प्रकरणाबाबतही दिल्लीत आपल्याला प्रश्न विचारले जातात की, “खरंच महाराष्ट्रात दिवाळखोरी झाली आहे का? नेमकी काय परिस्थिती आहे?” असे प्रश्न विचारले जातात, असे सुळे म्हणाल्या.

मंत्र्यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी नैतिकतेने राजीनामे द्यायला पाहिजे होते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. “मात्र, हे दुर्दैव आहे की यांना काढावं लागतं. दरवेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जायचं, त्यानंतर दिल्लीतून फोन आला की मग हे राजीनामे देतात. दरवेळी दिल्लीने हस्तक्षेप केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही का?” असा रोखठोक सवाल विचारत सुळे यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0