
Pune Harris Bridge : खडकवासला धरणातून 9 हजार क्युसेक विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे | शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्याच्या मुळा आणि मुठा नद्यांमध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खडकवासला आणि पवना धरण परिसरात झालेल्या संततधारेमुळे धरणांमधून खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
हॅरीस पुलाखालचा रस्ता पाण्याखाली, वाहतूक बंद
पवना धरणातून सुरू झालेल्या पाण्याच्या विसर्गाचा परिणाम पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या हॅरीस पुलाखालील रस्त्यावर जाणवला. बोपोडी येथील हा महत्त्वाचा रस्ता गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी ही माहिती दिली.
औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या या मार्गावरून दरवर्षी पुराच्या काळात खबरदारी म्हणून वाहतूक थांबवली जाते. यंदा जून महिन्यात प्रथमच हा रस्ता पाण्याखाली गेला आहे.
खडकवासलातून विसर्गात झपाट्याने वाढ
गुरुवारी दुपारी १ वाजता खडकवासला धरणातून २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, रात्रीपर्यंत ही मात्रा वाढत जाऊन ९ हजार क्युसेकपर्यंत पोहोचली. यामुळे मुठा नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहरात वाहतूक कोंडी आणि पाणी साचले
गुरुवारी दिवसभर शहरात जोरदार पाऊस झाल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. कामावर जाणाऱ्या आणि घरी परतणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
नदीपात्रात उतरू नये, नदीकाठी फिरणे टाळावे, जनावरे किंवा साहित्य नदीतून तात्काळ बाहेर काढावे, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या भागांतील नागरिकांना योग्य सूचना देण्याचे आदेश संबंधित क्षेत्रीय सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.



