Thackeray Group Member Joined Eknath Shinde : मुंबई व नाशिकमधील बडे चेहरे शिवसेनेत, शिंदे यांच्या गटाची ताकद वाढतेय
“भगवा पुन्हा मनपावर फडकणार” – एकनाथ शिंदेंचा विजयी आत्मविश्वास
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाला जोरदार हादरा देत येवला (नाशिक) येथील माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक गणेश सानप, त्यांच्या पत्नी सुजाता सानप आणि माजी नगरसेविका राज राजेश्वरी रेडकर यांनीही कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जोरदार एंट्री घेतली.



शिवसेनेच्या वाटचालीसाठी हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून, नाशिक आणि मुंबईतून नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात दाखल होत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे बळ अधिकच भक्कम होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करताना सांगितले, “गेल्या अडीच वर्षांत मुंबईच्या विकासासाठी भरीव कामे केली. तीच कामगिरी आणि जनसंपर्क आपल्या विजयाचे मुख्य हत्यार ठरेल. लोकांचा विश्वास आपल्यावर आहे आणि मनपात पुन्हा भगवा फडकवणार, यात शंका नाही.”
नाशिकमधील प्रकल्पांना चालना, शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य आणि जुनी पेन्शन योजना यावर सन्मानजनक तोडगा दिल्यामुळे शिक्षकवर्गाचेही पाठबळ मिळत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात शिक्षक आमदार किशोर दराडे यांची शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्तीही जाहीर करण्यात आली. उपस्थितांमध्ये अजय बोरस्ते, मीनाताई कांबळी, राम रेपाळे, सुशांत शेलार, वैभव थोरात आणि अन्य शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते.


