Santosh Deshmukh Murder Case : देशमुख हत्या प्रकरण: फरार आरोपी कृष्णा आंधळे गावी येऊन गेल्याचा खळबळजनक दावा; कुटुंबाला जीवे मारण्याची भीती

• बीड न्यायालयात सुनावणी पार पाडली 26 तारखेला सर्वोच्च न्यायालयात वाल्मिक कराडच्या जामिनावर फैसला
बीड :- बीडचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले आहे. या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आतापर्यंत तीन वेळा स्वतःच्या गावी येऊन गेल्याचा खळबळजनक दावा दिवंगत सरपंचांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. शनिवारी बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली, त्यानंतर माध्यमांशी बोलताना देशमुख यांनी पोलीस आणि सीआयडीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फरार आरोपी हा तांत्रिक तपास टाळण्यासाठी मोबाईलचा वापर करत नसल्याचे सांगत, त्याला तातडीने जेलबंद करावे आणि त्याची जिल्हाभरातून दिंड काढावी, अशी संतप्त मागणी त्यांनी केली आहे.
न्यायालयीन कामकाजात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. आजच्या सुनावणीत न्यायालयाने सरकारी पक्षाला सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र आरोपी क्रमांक 3 ते 7 यांनी निकम यांना बदलण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात दिला आहे. या अर्जावर सरकारी पक्षाकडून लवकरच लेखी म्हणणे मांडले जाणार आहे. तसेच, आरोपी जयराम चाटे यांनी आपला वकील बदलला असून आता या प्रकरणात एम. के. वाघीरकर त्यांची बाजू मांडणार आहेत. विष्णू चाटे याच्या जेल बदलीच्या अर्जावरही आज निर्णय येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे, आरोपी वाल्मिक कराड याच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली असून, येत्या 26 फेब्रुवारी रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. या जामिनाला विरोध करण्यासाठी देशमुख कुटुंबाने आधीच ‘कॅव्हेट’ दाखल केले आहे. आरोपींच्या वकिलांनी मात्र सरकारी पक्षावर घाई करत असल्याचा आरोप केला आहे. लॅपटॉपची क्लोन कॉपी, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पेन ड्राईव्ह अद्याप मिळाले नसल्याने तोपर्यंत साक्षीदारांची यादी स्वीकारू नये, अशी विनंती आरोपींचे वकील विकास खाडे यांनी न्यायालयाला केली. या तांत्रिक बाबींमुळे खटल्याची प्रक्रिया लांबणीवर पडत असून आता 6 मार्च रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले देशमुख कुटुंब सध्या दहशतीखाली असल्याचे धनंजय देशमुख यांनी नमूद केले आहे.


