Sanjay Raut : राज्यावर 10 लाख कोटींचा कर्जाचा डोंगर; महाराष्ट्राची अवस्था नेपाळसारखी’, संजय राऊत यांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Ajit Pawar And Mangal Prabhat Lodha : मुख्यमंत्र्यांसह अजित पवार आणि मंगलप्रभात लोढांवर गंभीर आरोप; ‘ही राज्याची लूट’
मुंबई :- महाराष्ट्रावर वाढलेल्या कर्जाच्या बोज्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यावर या वर्षाअखेरीस 10 लाख कोटींपर्यंतचा कर्जाचा डोंगर उभा राहण्याचा अंदाज असून, ही अवस्था नेपाळसारखी असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
महाराष्ट्राची लूट सुरू
संजय राऊत म्हणाले की, “गेल्या तीन महिन्यांत राज्याने २४ हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. ही राज्याची आर्थिक दुरावस्था आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली असून, विकासाची कामे ठप्प झाली आहेत.” ते पुढे म्हणाले की, “एसआरएची कामे फक्त मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांना मिळत आहेत आणि एसआयआय विकून पैसे कमावले जात आहेत. कबुतरांना दाणे टाकण्यापलीकडे राज्यात काहीही चालू नाही.”
राज्यातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जात-धर्मात भांडणे लावली जात आहेत. शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत महाराष्ट्राने काय प्रगती केली, याबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीर संवाद साधावा, अशी मागणीही राऊत यांनी केली.
अजित पवारांवरही टीका
आर्थिक शिस्तीबद्दल बोलताना राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “आर्थिक शिस्तीची काळजी घेणारे अजित पवार यावर काही भाष्य करणार आहेत का? स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचं, हे त्यांचं धोरण आहे. मग ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील.” राऊत यांनी थेट ‘डाकू’ असा शब्द वापरून भाजपवर टीका केली.
मंगलप्रभात लोढांच्या विभागावर भ्रष्टाचाराचा आरोप
संजय राऊत यांनी सर्वात मोठा भ्रष्टाचार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कौशल्य विकास विभागात होत असल्याचा गंभीर आरोप केला. “कौशल्य विकास योजनेच्या नावाखाली लाखो बोगस खाती उघडून दर महिन्याला पैसे दिले जातात. हे सर्व भाजपचे कार्यकर्ते आहेत,” असे ते म्हणाले.
‘शेतकऱ्यांची कर्जमाफी करा’
राऊत म्हणाले की, “राज्यावर कर्ज वाढत असताना सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही. राजकीय फायद्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. कर्ज घ्या, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, कारण एकट्या नाशिक जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.”


