Pune News : सोशल मीडिया पोस्टवरून दौंडमधील यवतमध्ये तणाव, जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर

•आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दोन गट आमनेसामने; आठवडी बाजार बंद, दुचाकी जाळल्या
पुणे :- दौंड तालुक्यातील यवत गावात एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला. शुक्रवारी दुपारी दोन गटांमधील लोक आमनेसामने आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या घटनेमुळे शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला, तर काही दुचाकीही पेटवून दिल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून यवतमध्ये तणावाचे वातावरण होते. गावात शांततेसाठी बैठकाही झाल्या होत्या, पण तरीही पोलिसांनी वेळीच गंभीर दखल न घेतल्याने ही घटना घडली, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. पोलिसांचे हे अपयश असल्याचाही सूर उमटत आहे.
आज दुपारी ही पोस्ट पुन्हा व्हायरल झाल्यानंतर परिस्थिती चिघळली. दोन्ही गटांचे लोक रस्त्यावर उतरले. याची माहिती मिळताच यवत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. पोलीस उपअधीक्षक संदीप गिल यांनी गावातील नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, गावातील महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.



