
Siddharth Shinde Pass Away : हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पुण्यात आज अंत्यसंस्कार
पुणे :- सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू सिद्धार्थ शिंदे यांचे अकस्मात निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 48 व्या वर्षी सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनामुळे दिल्ली आणि महाराष्ट्रातील कायदे वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अकस्मात निधन
मूळचे श्रीरामपूर येथील रहिवासी असलेले सिद्धार्थ शिंदे यांचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून पुण्यात स्थायिक झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सर्वोच्च न्यायालयात यशस्वीपणे वकिली करत होते. सोमवारी सर्वोच्च न्यायालयातील कामकाजादरम्यानच त्यांना अचानक चक्कर आली, त्यानंतर त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्न करूनही उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
न्यायालयाचे क्लिष्ट निर्णय सामान्य जनतेला सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज, मंगळवारी दिल्लीहून पुण्यात आणण्यात येणार असून, दुपारी 1 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


