Mumbai Crime News : ‘मुंबई दर्शन’ चा नशेत गोंधळ: गाडी थेट समुद्रात,मद्यधुंद अवस्थेत समुद्रकिनाऱ्यावर गाडी नेल्याने वाळूत रुतली

•तीन तरुणांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त
मुंबई | शहर पाहण्यासाठी मुंबईत आलेल्या दोन मित्रांनी स्थानिक मित्रासोबत शुक्रवारी रात्री धिंगाणा घातला. मद्यधुंद अवस्थेत त्यांनी जुहू समुद्रकिनाऱ्यावर गाडी चालवत ती थेट समुद्राच्या पाण्यात नेली. परिणामी, वाहन वाळूत रुतून बसले आणि पोलीस व अग्निशमन दलाच्या संयुक्त प्रयत्नानंतर तब्बल दोन तासांनी वाहन बाहेर काढण्यात यश आले. तिघांविरोधात मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडी जप्त करण्यात आली आहे. Mumbai Latest Crime News
खार परिसरातील रहिवासी तरुण यादव (36 वय) याच्याकडे त्याचे दोन मित्र – नजीब सय्यद (42 वय, आंध्रप्रदेश) व ब्रिजेश सोनी (33 वय, मध्यप्रदेश) – काही दिवसांसाठी आले होते. शहरातील पर्यटनानंतर शुक्रवारी रात्री तिघांनी भरपूर मद्यप्राशन केले आणि नशेतच कारने जुहू समुद्रकिनाऱ्यावर धडक मारली. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते गाडी समुद्रकिनाऱ्याच्या वाळूत घेऊन गेले आणि नादानपणात ती थेट समुद्राच्या दिशेने घातली.
परिणामी, कार वाळूत खोल अडकून बसली. हा प्रकार गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलास पाचारण केले. ट्रॅक्टरच्या मदतीने वाहन बाहेर काढण्यासाठी सुमारे दोन तास प्रयत्न करण्यात आले. अखेर वाहन किनाऱ्यावर आणण्यात यश आले.
पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या निष्काळजीपणामुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता होती, त्यामुळे वाहन जप्त करून पुढील चौकशी सुरू असल्याचे जुहू पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


