
Ahmednagar reel news : फेमस होण्याच्या नादात गळफास लावून व्हिडीओ करण्याचा प्रयत्न
अहमदनगर – सोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्ध होण्याच्या नादात तरुणांनी जीव धोक्यात घालण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये घडला आहे. प्रकाश बुडा (रा. नेपाल) या तरुणाने ‘फेमस’ होण्यासाठी गळफास लावतानाचा व्हिडीओ शूट करताना खरंच गळफास लागल्याने तो गंभीर जखमी झाला.
सामाजिक कार्यकर्त्याच्या तत्परतेमुळे जीव वाचला, पण स्थिती चिंताजनक
प्रकाश सध्या जामखेडमधील एका हॉटेलमध्ये काम करतो. सोशल मीडियावर रील बनवण्याच्या उद्देशाने त्याने फाशी घेण्याचे नाटक सुरू केले. मात्र, प्रत्यक्षात गळ्याभोवती अडकलेली दोरी घट्ट झाली आणि काही क्षणातच तो बेशुद्ध झाला. परिसरात गोंधळ उडाला आणि याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी प्रसंगावधान राखत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या प्रकाशची प्रकृती चिंताजनक आहे.
ही घटना केवळ प्रकाशसाठीच नाही, तर अशा स्टंट करणाऱ्या सर्व तरुणांसाठी धोक्याचा इशारा आहे. कोठारी यांनीही समाजाला आवाहन केलं आहे की, फक्त काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी जीवाशी खेळू नका. सोशल मीडियाच्या आहारी जाऊन असे जीवघेणे प्रकार टाळणं गरजेचं आहे.



