नाशिक

Devyani Farande : “कार्यकर्त्यांचा बळी दिला जातोय!”; पक्षप्रवेशावरून भाजप आमदार देवयानी फरांदे भावूक, गिरीश महाजनांनाही लगावला टोला

•”काही दलालांनी स्वार्थासाठी राजकारण केलं”; नाशिक भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर

नाशिक | नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट आणि मनसेच्या बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असला, तरी यावरून भाजपमधील अंतर्गत कलह अधिक गडद झाला आहे. या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध करणाऱ्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आज आपली व्यथा मांडली. “माझ्या डोळ्यांसमोर कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल तर हे मला मान्य नाही,” असे म्हणताना फरांदे यांना भर सभागृहात कंठ दाटून आला.

निष्ठावंतांवर अन्याय नको!

पक्षात आलेल्या नवीन नेत्यांचे स्वागत करतानाच फरांदे यांनी जुन्या कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट करून दिली. त्या म्हणाल्या, “मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्ष मोठा होणे चांगलेच आहे, पण पक्ष मोठा होत असताना वर्षानुवर्षे रक्त आटवणाऱ्या निष्ठावंतांवर अन्याय व्हायला नको. मला वाईट वाटतेय की, आज माझ्या भूमिकेसोबत पक्षाचे इतर जुने नेते उभे राहिले नाहीत. तसे झाले असते तर कार्यकर्त्यांना वेगळा आणि सकारात्मक संदेश गेला असता.”

दलालांचा स्वार्थ आणि चुकीचे ब्रीफिंग

मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशावर बोलताना फरांदे यांनी मधल्या फळीतील नेत्यांवर निशाणा साधला. “मी गिरीश महाजन यांच्यावर नाराज नाही, पण त्यांना चुकीच्या पद्धतीने ‘ब्रीफ’ करण्यात आले आहे. काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी स्वतःच्या घरातील उमेदवारीसाठी हे राजकारण शिजवले आहे,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

“आम्ही संस्थानिक नाही, संघर्षातून आलोय”

आपल्या कौटुंबिक निष्ठेची आठवण करून देताना देवयानी फरांदे म्हणाल्या,”आमची तिसरी-चौथी पिढी भाजपच्या विचारधारेत आहे. माझे सासरे 1990 मध्ये शहराध्यक्ष होते, तर सुहास फरांदे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे.””मी काही संस्थानिक नाही. नगरसेविका म्हणून संघर्ष करत मी इथपर्यंत पोहोचले आहे. माझ्या कुटुंबाने 40 वर्षे पक्षासाठी काम केले आहे.”आज जे चार प्रवेश झाले, ते झाले नसते तरी या मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित होता, असा माझा ठाम विश्वास होता.”

वरिष्ठांकडे गाऱ्हाणे मांडणार

गिरीश महाजन यांनी जरी ‘प्रवेश म्हणजे उमेदवारी नाही’ असे स्पष्ट केले असले, तरी फरांदे यांचे समाधान झालेले नाही. “नेत्यांचा बळी जात असेल तर गोष्ट वेगळी, पण कार्यकर्त्यांचा बळी जात असेल तर ते संकेत चांगले नाहीत. मी माझी आणि कार्यकर्त्यांची ही भूमिका पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत निश्चितपणे पोहोचवणार आहे,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0