Vaibhav Khedekar : ‘मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर मत बसा लेना’; वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश पुन्हा रखडला, व्हॉट्सॲप स्टेटसची जोरदार चर्चा

•शक्तीप्रदर्शन करत मुंबईत दाखल, पण भाजप प्रवेशाची गाडी तिसऱ्यांदा वेटिंगवर
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (मनसे) बडतर्फ करण्यात आलेले कोकणातील नेते वैभव खेडेकर यांचा भाजपमधील प्रवेश पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. शेकडो समर्थकांसह गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईतील भाजप कार्यालयात दाखल झाल्यानंतरही त्यांना पक्षप्रवेश मिळाला नाही. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यामुळे नाराज झालेल्या खेडेकर यांचे ‘मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर मत बसा लेना’ असे व्हॉट्सॲप स्टेटस सध्या जोरदार चर्चेत आले आहे, जो भाजपला एक प्रकारे इशारा असल्याचे मानले जात आहे.
दोनदा रखडला भाजप प्रवेश
मनसेतून बडतर्फ झाल्यानंतर वैभव खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. गणेशोत्सवादरम्यान त्यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन हा निर्णय घेतला. त्यानुसार 4 सप्टेंबर रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रवेश निश्चित झाला होता. मात्र, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे तो प्रवेश पुढे ढकलण्यात आला.
नियोजित वेळेनुसार मंगळवारी (23 सप्टेंबर) पुन्हा त्यांच्या पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात आले होते. खेडेकर यांनी रत्नागिरीतून 40 ते 50 गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईत शक्तीप्रदर्शन करत भाजप कार्यालयात दाखल झाले. मात्र, यावेळीही त्यांच्या पक्षप्रवेशाची गाडी थांबली. भाजपच्या कोणत्याच मोठ्या नेत्याने त्यांच्या प्रवेशाकडे लक्ष दिले नाही. यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत
सतत तिसऱ्यांदा पक्षप्रवेश रखडल्यानंतर वैभव खेडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले आहे. “मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर मत बसा लेना, मे समुंदर हू लौटकर जरूर आउंगा” या हिंदी वाक्यातून त्यांनी एक प्रकारे राजकीय पुनरागमनाचा इशारा दिला असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांनी खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाकडे पाठ फिरवल्याने रत्नागिरी जिल्ह्यात हा विषय चर्चेचा बनला आहे. आता भाजप त्यांना कधी हिरवा कंदील दाखवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


