Ajit Pawar : आचारसंहिता लागू होताच अजित पवारांचा पहिला ‘दणका’! – पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप, ठाकरे गटाला जोरदार धक्का

Ajit Pawar Pune PCMC Latest News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाधववडीतील माजी नगरसेवक, महिला संघटिकासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत घेतले; ‘स्वबळावर’ लढण्यासाठी रणनीती सुरू
पिंपरी-चिंचवड :- राज्यातील 29 महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून (15 डिसेंबर) लागू होताच, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये लगेचच राजकीय हालचालींना सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी मंगळवारी भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही प्रमुख पक्षांना जोरदार धक्का दिला आहे.



पक्षप्रवेशाचा धमाका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर, अजित पवारांनीही पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) सत्ता आणण्यासाठी तातडीने रणनीती आखण्यास सुरुवात केली. मंगळवारी पुण्यात झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजप आणि ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
भाजपला धक्का: जाधववडी येथील भाजपच्या माजी नगरसेवक अश्विनी जाधव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.
ठाकरे गटाला धक्का: शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या महिला संघटिका रुपाली आल्हाट आणि शिवसेनेचे उपशहरप्रमुख नेताजी काशीद यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. ‘नवीन सहकाऱ्यांच्या मदतीने पिंपरी-चिंचवड भागातील संघटन अधिक मजबूत होईल आणि पक्षाच्या जनकल्याणाच्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या पक्षप्रवेशावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, निवडणूक प्रमुख नाना काटे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पवारांनी केलेल्या या खेळीमुळे पिंपरी-चिंचवडमधील निवडणुकीचा ‘रणसंग्राम’ आणखी चुरशीचा होणार आहे.



