‘CRED’, ‘MParivahan’ च्या बनावट ॲप्सने फसवणूक; भाईंदर पोलिसांनी दोघांना अटक केली

Bhayandar Latest Fraud News : मोबाईल हॅक करून Flipkart द्वारे महागडे फोन खरेदी, 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
भाईंदर :- ‘CRED’, ‘MParivahan’ सारख्या लोकप्रिय ॲप्सच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा भाईंदर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नागरिकांचे मोबाईल हॅक करून, त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन खरेदी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 28 महागडे मोबाईल फोन आणि रोख 4 लाख रुपये जप्त केले आहेत.
नेमके काय घडले?
भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान, पोलिसांनी या टोळीचा शोध घेतला. यातील आरोपी स्वतःची ओळख लपवून नागरिकांचे मोबाईल हॅक करत होते. ते बँक खात्यांची माहिती आणि ओटीपी (OTP) मिळवून 4 लाख 77 हजार 989 रुपयांची फसवणूक करून Flipkart वरून महागडे मोबाईल फोन खरेदी करत होते.
तपास कसा झाला?
या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपींच्या कार्यप्रणालीची सखोल माहिती मिळवली. तपासादरम्यान, पोलिसांनी संशयित रिंकू कुमार बैरवा याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, तो पुष्पेंद्र कुमार (राजस्थान) नावाच्या व्यक्तीसाठी बनावट नावाने मोबाईल डिलिव्हरी घेण्यासाठी आलेला होता.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी ऐरोली, नवी मुंबई येथे सापळा रचून पुष्पेंद्रचा साथीदार कौस्तुभ जाधव याला रात्री अटक केली. चौकशीत कौस्तुभने हा गुन्हा त्याचे साथीदार पुष्पेंद्र कुमार आणि देव यादव यांच्यासोबत केल्याचे कबूल केले.
नागरिकांना फसव्या लिंक्सपासून सतर्क राहण्याचे आवाहन; सायबर फसवणुकीची मोठी टोळी उघडकीस
आरोपी नागरिकांचे मोबाईल क्रमांक मिळवून, ‘CRED.Apk’, ‘MParivahan Fake ULApk’, ‘Adult Chat. Apk’ अशा बनावट ॲप्स आणि लिंक्सद्वारे त्यांचे फोन हॅक करत होते. हॅक केलेल्या फोनचा वापर करून ते कॉल फॉरवर्डिंग, एसएमएस फॉरवर्डिंग, यूपीआय पिन हॅक करणे अशा अनेक तंत्रांचा वापर करून बँक खात्यातून पैसे चोरत होते.
त्या पैशांनी ते Flipkart वरून महागडे Apple, Nothing, OnePlus, Samsung फोन खरेदी करायचे आणि ते इतर लोकांना विकून त्यांचीही फसवणूक करत होते.
पोलिसांचे आवाहन
या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही फसव्या लिंकवर किंवा ॲप्लिकेशनला बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली.


