Jalna Bribe News : पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी आणि खाजगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात

•वडिलोपार्जित जागा आणि घर वारसा हक्काने (8 अ) चे प्रमाणपत्र देण्याकरिता मागितली होती लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांची धडक कारवाई
जालना :- भणंगजळगाव, अंबड येथे बुधवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई करत ग्रामविकास अधिकारी आणि खाजगी व्यक्ती यांना पाच हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. जयसिंग रूपाला राठोड (55 वय) ग्रामविकास अधिकारी, श्रीभाऊ रावसाहेब खोजे (77 वय) खाजगी व्यक्ती असे अटक केलेल्या व्यक्तींचे नाव आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांचे आजोबा व वडील हे मयत असून आजोबा यांचे नावे असलेले घर व मोकळी जागा तक्रारदार व तक्रारदार यांचे काकांचे नावे वारसाहक्काने करून नमुना (8 अ ) चे प्रमाणपत्र देण्याकरिता ग्रामविकास अधिकारी यांनी तक्रारदार यांना पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तीन हजार यापूर्वीच स्वीकारून उर्वरित दोन रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी 1 एप्रिल 2025 रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकास,अंबड येथे लिखित तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने दिनांक 1 एप्रिल रोजी अंबड येथे आरोपीचे खाजगी कार्यालयात पडताळणी केली असता, राठोड यांनी उर्वरित दोन हजार रुपयांची लाचेची मागणी करून ते स्वीकारण्याचे मान्य केले व खाजगी श्रीभाऊ खोजे यांनी प्रोत्साहन दिले.यातील आरोपी लोकसेवक याने बुधवारी,2 एप्रिल रोजी तक्रारदार यांचेकडून दोन हजार रुपये स्वतःचे खाजगी कार्यालयात पंचासमक्ष स्वीकारले असता ग्रामविकास अधिकारी राठोड याला लाचेचे रकमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. दोघांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई संदीप आटोळे,पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव,अप्पर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर बाळु जाधवर पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वी. जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे सापळा पथक पोलिस अंमलदार भालचंद्र बिनोरकर, अमोल चेके, गजानन घायवट, श्रीनिवास गुडूर, शिवलिंग खुळे यांनीही कारवाई केली आहे.


