पुणे
Trending

Puja Khedkar : IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना दणका! ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र अखेर रद्द

Puja Khedkar : दिशाभूल केल्याचे निष्पन्न; राज्य सरकारला अहवाल सादर, शासकीय सेवेतील गैरव्यवहारावर टाच

पुणे,:- भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) बडतर्फ प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्राचा वाद अखेर संपुष्टात आला आहे. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने सुनावणीअंती हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि महागड्या गाड्या असतानाही खेडकर Puja Khedkar यांनी हे प्रमाणपत्र मिळवल्याचा त्यांच्यावर आक्षेप होता. या आक्षेपात तथ्य आढळल्यानेच हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

इतर मागास प्रवर्गातील (OBC) उमेदवारांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र आवश्यक असते. यासाठी उमेदवाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशी प्रमुख अट आहे. मात्र, पूजा खेडकर यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीच्या तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांकडून हे प्रमाणपत्र मिळवले होते. यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त शासकीय अधिकारी असून, त्यांनी नुकतीच लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी तब्बल 40 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. यावरूनच त्यांच्या ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्रावर संशय बळावला.

पूजा खेडकर यांचे ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र वादात सापडल्यानंतर स्थानिक प्रशासनाने केलेल्या गोपनीय छाननीत खेडकर कुटुंबाच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे उघड झाले. पूजा खेडकर यांनी दिशाभूल करून हे प्रमाणपत्र मिळवल्याचा गोपनीय अहवाल प्रशासनाने सादर केला होता. या आधारे, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने पूजा खेडकर यांना ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या अर्धन्यायिक प्रक्रियेत महसूल आयुक्त कार्यालयाने अत्यंत गोपनीयता बाळगली. पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी वकिलांमार्फत आपले म्हणणे मांडले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर, अखेर हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रमाणपत्र रद्द करण्यामागे सविस्तर कारणे नमूद करण्यात आली असून, पूजा खेडकर यांनी दिशाभूल करून हे प्रमाणपत्र मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0