Pune Crime News : बंडगार्डन पोलिसांची मोठी कामगिरी: 2 वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

•शिवाजीनगरमधील खून आणि बंडगार्डनमधील बलात्कार प्रकरणातील आरोपीला धायरीतून अटक
पुणे :- पुणे शहर पोलिसांच्या गुन्हेगारांविरोधातील कारवाईला मोठे यश मिळाले आहे. बंडगार्डन पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खून प्रकरणातील आणि स्वतःच्या हद्दीतील एका बलात्कार प्रकरणातील अशा दोन गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपीला अटक केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीला धायरी परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल लक्ष्मण भोले (रा. ताडीवाला रोड) हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक होता. हा गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्याचसोबत, बंडगार्डन पोलीस ठाण्यातही त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल होता.
धायरी येथे रचला सापळा
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला आरोपी विशाल भोले हा धायरी, सिंहगड परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले. पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, अंमलदार ज्ञाना बडे, मनोज भोकरे आणि मनिष संकपाळ यांच्या पथकाने धायरी येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, दोन्ही गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त अतुल कुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कामगिरीचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.



