
Jayant Patil On Ajit Pawar NCP : अजितदादा चार वेळा जयंत पाटलांच्या घरी जेवायला गेले होते; जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पक्ष एकत्र करण्याचा होता ‘मास्टर प्लॅन’
मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवारAjit Pawar यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला आहे. यातच जयंत पाटील यांनी केलेल्या एका खुलाशामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “माझ्याबद्दल जे काही जनमानसात चुकीचे आहे, ते सर्व पुसून पुन्हा साहेबांच्या सोबत यायचे आहे,” अशी तीव्र इच्छा अजितदादांनी वारंवार बोलून दाखवली होती, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
जयंत पाटलांच्या घरी रंगायच्या ‘गुप्त’ बैठका
विलीनीकरणासाठी गेल्या सहा महिन्यात सुमारे 8 ते 10 बैठका झाल्या होत्या, ज्याचे केंद्रस्थान जयंत पाटील यांचे निवासस्थान होते. पाटील म्हणाले की, “दादा अनेकदा संध्याकाळी माझ्या घरी यायचे, आम्ही सोबत जेवण करायचो आणि तासनतास चर्चा करायचो. सुरुवातीच्या चार बैठकांमध्ये तर दादा केवळ आपल्या भावना व्यक्त करत होते. शरद पवारांविषयी त्यांच्या मनात आजही प्रचंड आदर होता.”
12 फेब्रुवारीला होणार होते विलीनीकरणाचे ‘सरप्राईज’
दोन्ही पक्ष एकत्र करण्यासाठी एक निश्चित आराखडा तयार करण्यात आला होता:
निवडणूक आणि युती: सुरुवातीला जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवायच्या आणि निकाल लागल्यानंतर विलीनीकरणाची घोषणा करायची, असे ठरले होते.
12 तारीख का निवडली?: चर्चेअंती 12 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. दादांनी स्वतः सांगितले होते की, “जयंत पाटील ठरवतील ती तारीख मला मंजूर आहे.”या चर्चेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि हर्षवर्धन पाटील यांचाही समावेश होता.
‘त्या’ पहाटे शरद पवारांशी झाली होती भेट
जयंत पाटील यांनी एका महत्त्वाच्या प्रसंगाचा उल्लेख केला. विलीनीकरणाच्या चर्चेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी जयंत पाटील आणि इतर नेते पहाटेच गाडीने निघून सकाळी 8 वाजता शरद पवारांच्या समोर बसले होते. तिथे सविस्तर चर्चा झाल्यानंतरच 12 फेब्रुवारी ही तारीख फायनल करण्यात आली होती. विशेष म्हणजे, बारामतीची धावपट्टी लहान असल्याने तिथे विमान उतरण्यास अडचण येत होती, म्हणूनच हे नेते रस्तेमार्गे शरद पवारांना भेटायला गेले होते.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया
आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत, यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. सध्या त्या गटाचे निर्णय प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ घेत आहेत, असे दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच हा निर्णय होत असावा.”
अजितदादांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय विलीनीकरणाची प्रक्रिया अधुरी राहिली आहे. मात्र, दादांच्या मनात साहेबांबद्दल असलेली ओढ आणि पक्ष पुन्हा एक करण्याची जिद्द आज जयंत पाटलांच्या शब्दांतून महाराष्ट्रासमोर आली आहे.


