Pune Rave Party News : पुण्याच्या ‘ड्रग पार्टी’ प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्या दारू पिण्याची पुष्टी!

•वैद्यकीय अहवालात खुलासा; एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे :- पुण्यातील खराडी परिसरात नुकत्याच उघडकीस आलेल्या कथित ‘ड्रग पार्टी’ प्रकरणात अटकेत असलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर आणि आणखी एका व्यक्तीने मद्यपान केल्याची वैद्यकीय अहवालातून पुष्टी झाली आहे. पुणे पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, खेवलकर यांच्या अटकेमागे राजकीय सूडाची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीटीआयला दिलेल्या निवेदनात याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, खेवलकर यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) च्या राज्य अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोमवारी (28 जुलै) सायंकाळी पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, वैद्यकीय तपासणीत डॉ. खेवलकर आणि अन्य एका आरोपीने मद्यपान केल्याची पुष्टी झाली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, ड्रग्सच्या सेवनाबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.
डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर हे प्रकरण आता अधिकच राजकीय रंग घेऊ लागले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी यापूर्वीच पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘रेव्ह पार्टी’ची व्याख्या आणि आरोपींचे चेहरे माध्यमांसमोर आणल्याबद्दल पोलिसांवर टीका केली होती.
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मी अजून ससून रुग्णालयाचा अहवाल वाचलेला नाही, त्यामुळे ड्रग्सबद्दल काहीही बोलू शकत नाही. परंतु, जर ड्रग्सचे सेवन झाले असेल तर शिक्षा मिळायलाच हवी.” मात्र, त्यांनी पुढे म्हटले, “मला वाटते की खेवलकर यांची अटक ही राजकीय कटकारस्थान आहे, कारण खडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली होती.”



