Ambernath Crime News : अंबरनाथच्या वायू सेनेच्या हद्दीत बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट, 3 महिलांना अटक

•विशेष शोध मोहिमेत तीन महिलांना अटक; सुरक्षा यंत्रणा सतर्क
अंबरनाथ :- अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी परिसरात भारतीय वायुसेनेच्या संवेदनशील हद्दीला लागून असलेल्या अनधिकृत चाळींमध्ये बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हिललाईन पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका विशेष शोध मोहिमेत, तीन बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आले असून, त्यांना कायदेशीर कारवाईनंतर मायदेशी पाठवण्यात आले आहे. कमी पैशात घरे मिळत असल्याने बांधकाम माफियांचा फायदा होत आहे, मात्र यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
नेवाळी नाका आणि काटई-अंबरनाथ रस्त्यावर अनधिकृत चाळींचे जाळे वेगाने वाढत आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना सुरू असलेल्या या बांधकामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या चाळींमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना आश्रय मिळत असल्याने या भागात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. यापूर्वीही पोलिसांनी येथे अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे, ज्यात एका बांगलादेशी अभिनेत्रीचाही समावेश होता. पोलिसांच्या कारवाईनंतरही ही परिस्थिती कायम असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हिललाईन पोलिसांनी केलेल्या कारवाईत साथी आयुब शेख, रूपा हसन शेख आणि ज्योती अब्दुल शेख या तीन महिला नेवाळी आणि द्वारली परिसरात आढळल्या. त्यांना ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि मायदेशी पाठवण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या भागात अशाप्रकारे होणारी घुसखोरी चिंताजनक आहे. पोलीस यंत्रणेसोबतच सुरक्षा दलांनीही यावर अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.


