Pune Ganpati Visarjan : पुण्यात मानाच्या गणपतींनी पाळली वेळ; शिस्तबद्ध मिरवणुकीचा आदर्श घालून बाप्पाला जल्लोषात निरोप!

Pune Ganpati Visarjan Latest News : ढोल-ताशांच्या पारंपरिक गजरात पुणेकर हरखले, मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन ठरलेल्या वेळेत पूर्ण; दगडूशेठच्या रथाने वेधले लक्ष
पुणे :- अनंत चतुर्दशीच्या उत्साहात पुणे शहराने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला. या विसर्जन सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मानाच्या पाचही गणपतींनी दाखवलेली शिस्त आणि वेळेचे काटेकोर पालन. यंदा प्रशासनाने दिलेल्या वेळेनुसारच विसर्जन मिरवणुका पार पडल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीने सायंकाळी 3.47 वाजता आपले विसर्जन केले, तर त्यानंतर तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन 4.10 वाजता, गुरुजी तालीम गणपतीचे 4.35 वाजता, तुळशीबाग गणपतीचे 4.59 वाजता आणि मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे विसर्जन 5.39 वाजता पार पडले. ठरलेल्या वेळेत मिरवणुका पोहोचल्याबद्दल पोलीस आणि प्रशासनाने मंडळांचे अभिनंदन केले.
या विसर्जन सोहळ्याला यंदा डीजेचा कर्कश आवाज नव्हता, त्याऐवजी पारंपरिक ढोल-ताशांच्या निनादात मिरवणुकांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. महिनाभराच्या सरावानंतर ढोल पथकांनी आपल्या कलेचे प्रदर्शन घडवत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत रंगत आणली. “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
पुण्यातील श्रद्धेचे केंद्र असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा भव्य रथ पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.तब्बल 7 बैलगाड्यांनी ओढल्या जाणाऱ्या या रथाचे वैभव पाहण्यासारखे होते. तसेच, तुळशीबाग गणपतीने आपल्या देखण्या सजावटीने आणि गुरुजी तालीम गणपतीने आपल्या पारंपरिक थाटाने पुणेकरांची मने जिंकली. मानाचा पाचवा गणपती, केसरीवाडा गणपतीने कृत्रिम तलावात विसर्जन करत पर्यावरणाचा संदेश दिला.



