
Mumbai Latest Weather Update : ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाचा जोर, मध्य महाराष्ट्रातही अलर्ट
मुंबई | मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून, काही भागांत वादळी वाऱ्यांसह गडगडाटी पावसाचा तडाखा बसला. दक्षिण मुंबईतील वरळी, दादर, परळ ते घाटकोपर, कुर्ला आणि पवईसारख्या उपनगरांमध्ये सकाळपासून रस्त्यांवर पाणी साचू लागले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, येत्या काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, हलक्याफुलक्या सरींसह हवामानात गारवा निर्माण झाला आहे.
दरम्यान, मोसमी वाऱ्यांनी गुजरात, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि बिहारमध्येही आपला प्रभाव वाढवला आहे. येत्या दोन दिवसांत हे वारे राजस्थान आणि उर्वरित उत्तर भारतातही सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


