धाराशिव

Dharashiv News : खासदार ओमराजे निंबाळकर यांचे धाडस! पुरात अडकलेल्या कुटुंबाला स्वतःच्या खांद्यावर घेऊन केले बचावकार्य

• परंडा तालुक्यातील वडनेर गावात अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर, एनडीआरएफच्या टीमसोबत खासदार यांचे बचावकार्यात सहभाग

धाराशिव :- अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्याने वेढलेल्या धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील वडनेर गावात शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रात्री 2 वाजल्यापासून पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकाच कुटुंबातील आजी आणि एका दोन वर्षांच्या चिमुकल्यासह चार जणांना खासदार निंबाळकर यांनी स्वतः एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. या बचावकार्यामुळे परिसरात ओमराजे यांच्याबद्दल आदर वाढला असून, त्यांच्या कृतीची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. धाराशिव जिल्ह्यातही परंडा तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. वडनेर गावात अतिवृष्टीमुळे अचानक पूर आला आणि एका कुटुंबाचे घर पाण्याने वेढले गेले. घरात अडकलेल्यांमध्ये एक वृद्ध महिला, एक दोन वर्षांचा चिमुकला आणि अन्य दोन व्यक्तींचा समावेश होता. रविवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून हे कुटुंब अन्नाविना आणि मदतीच्या अपेक्षेने अडकले होते.

या घटनेची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी एनडीआरएफच्या (NDRF) जवानांना पाचारण केले. स्वत: बचावकार्यात सहभागी होत त्यांनी अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल सोमवारी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास त्यांना या बचावकार्यात यश आले. खासदार निंबाळकर यांनी स्वतः कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.

एनडीआरएफ आणि गावकऱ्यांचे आभार

या यशस्वी बचावकार्यानंतर खासदार निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी एनडीआरएफच्या जवानांचे आणि बचावकार्यात मदत करणाऱ्या गावकऱ्यांचे मनापासून आभार मानले. नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींनी कसे काम केले पाहिजे, याचे उत्तम उदाहरण ओमराजे निंबाळकर यांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0