मुंबई

BMC Elections 2026 : लोकशाहीचा उत्सव की ‘राड्या’चा धुराळा? डोंबिवलीत महायुतीचे मित्रच आपसात भिडले, तर वरळी-जळगावात ‘लक्ष्मी दर्शना’ची चर्चा!

•मतदानापूर्वी राज्याचा राजकीय पारा चढला; कुठे कोयत्याने हल्ला तर कुठे पैशांच्या पाकिटांचे व्हिडीओ व्हायरल!

मुंबई/डोंबिवली | राज्यातील 29 महापालिकांच्या रणधुमाळीत मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच, लोकशाहीच्या या उत्सवाला हिंसक वळण लागल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) डोंबिवलीत एकमेकांच्या जीवावर उठले असून, मुंबईच्या वरळीपासून ते खान्देशातील जळगावपर्यंत ‘पैशांचा पाऊस’ पडत असल्याचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकारांमुळे शांततेत पार पडणाऱ्या निवडणुकीला गालबोट लागले असून पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे.

डोंबिवलीत ‘दोस्ती’त पडली उभी फूट!

डोंबिवलीच्या तुकारामनगर परिसरात काल रात्री जो थरार घडला, त्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. महायुतीमधील मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते चक्क एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेना उमेदवारांवर कोयत्याने हल्ला केल्याचा खळबळजनक आरोप केला, तर शिवसेनेच्या नितीन पाटील यांनी भाजपवरच ‘पैसे वाटप’ करताना रंगेहाथ पकडल्याचा पलटवार केला. पोलीस ठाण्यासमोर दोन्ही पक्षांनी लावलेला ठिय्या आणि झालेली तुंबळ हाणामारी यामुळे डोंबिवलीत सध्या निवडणुकीच्या उत्साहापेक्षा तणावाचेच सावट अधिक दाट दिसत आहे.

वरळीत ‘मशाल’ विरुद्ध ‘लक्ष्मी’ची चर्चा?

दुसरीकडे, वरळी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग 193 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांचे पती हरिश वरळीकर यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला असून, यात ते महिलांच्या बैठकीत पैसे वाटप करत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. विशेष म्हणजे, ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या सूर्यकांत कोळी यांनीच हा ‘बॉम्ब’ टाकल्याने आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने वरळीच्या रिंगणात आता ‘अस्मिता’ विरुद्ध ‘पैसे’ असा नवा सामना सुरू झाला आहे.

जळगावात ‘रोजंदारी’ की ‘मते खरेदी’?

जळगावच्या प्रभाग 11 मधूनही असाच एक संशयास्पद व्हिडीओ समोर आला असून, तिथे शिवसेना शिंदे गटावर पैसे वाटपाचे आरोप झाले आहेत. मात्र, शिवसेनेच्या महिला आघाडीने हा दावा फेटाळून लावत, हा प्रचार रॅलीतील महिलांच्या ‘रोजंदारी’चा विषय असल्याचे स्पष्ट केले आहे. एका बाजूला प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी, पडद्यामागून सुरू असलेल्या या घडामोडींनी निवडणूक आयोगाची झोप उडवली आहे. ठिकठिकाणी भरारी पथके तैनात करण्यात आली असून, पैशांच्या जोरावर मते फिरवण्याचे प्रयत्न प्रशासन कसे हाणून पाडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0