Sanjay Raut : “ज्या पक्षाचा बापच अनौरस, त्यांचं काय बोलायचं?”; संजय राऊतांची उपमुख्यमंत्री आणि फडणवीसांवर जहरी टीका

•”भाजपने कुत्रे पकडण्याचे पिंजरे लावलेत, शिंदेंची मुलं तेच पळवणार”; स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरूनही राऊतांची फटकेबाजी
मुंबई | ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत ‘फ्रंटफुट’वर येत सत्ताधारी महायुतीचा अक्षरशः धुराळा उडवला. “एकनाथ शिंदेंनी आधी स्वतःची मुलं सांभाळावीत, भाजपच त्यांची मुलं पळवण्यासाठी कुत्रे पकडण्याच्या गाडीसारखे पिंजरे लावून बसली आहे,” अशा जहाल शब्दांत राऊतांनी उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
“बापच चोरीचा आणि अनौरस!”
राज ठाकरे यांनी ‘मुलं पळवणाऱ्या टोळी’चा उल्लेख केल्यानंतर, संजय राऊतांनी या टीकेची धार अधिक तीव्र केली. ते म्हणाले,”एकनाथ शिंदे यांचा पक्ष चोरीचा आहे. ज्या पक्षाचा बापच चोरीचा आणि अनौरस आहे, त्याबद्दल काय बोलायचे? अमित शाह यांनी या पक्षाला नाव दिले असले तरी, महापालिका निवडणुकीनंतर कळेल कोणाची मुलं कोण पळवतंय ते. शिंदेंच्या पक्षातील लोकांनी सावध राहावे, कारण भाजप त्यांना पळवण्यासाठी टपून बसली आहे.”
बाळासाहेबांमुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात!
देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार करताना राऊत म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्ही आज या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकलात. अन्यथा तुम्हाला एखाद्या छोट्या भागाचे (विदर्भाचे) मुख्यमंत्री होऊन राहावे लागले असते. मराठी माणसासाठी गोपीनाथ मुंडे यांचा अपवाद वगळता भाजपने कधीही आवाज उठवला नाही.”
स्वतंत्र विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना घेराव
अधिवेशनादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘स्वतंत्र विदर्भ’ करण्याबाबत केलेल्या विधानाचा दाखला देत राऊतांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. “बावनकुळे विदर्भ तोडण्याची भाषा करतात आणि मुख्यमंत्री गप्प बसतात. दोन्ही ठाकरे बंधू महाराष्ट्र तोडणाऱ्यांविरोधात खंबीरपणे उभे आहेत. मुख्यमंत्र्यांनी बावनकुळेंना जाब विचारण्याचे धाडस का दाखवले नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“महापालिका निवडणुकीत दूध का दूध होईल”
“दोन शून्यांची बेरीज” या फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले की, महापालिका निवडणुका होऊ द्या, मग कोणाचे अस्तित्व शून्य आहे आणि कोणाची ताकद ‘नंबर वन’ आहे हे स्पष्ट होईल. भाजप आणि शिंदे सेनेने कितीही पिंजरे लावले तरी मराठी माणूस आता ठाकरेंच्या ‘मशाल’ आणि ‘इंजिन’च्या पाठीशी ठाम उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



