Cricket Live Update : लॉर्ड्सवर पराभव आणि WTCमध्ये घसरण – टीम इंडियाला दुहेरी धक्का!

•इंग्लंडकडून 22 धावांनी पराभव; पॉइंट्स टेबलमध्ये भारत थेट चौथ्या स्थानी
IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत लॉर्ड्सवर भारतीय संघाला 22 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या पराभवाचं मोठं पडसाद वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या गुणतालिकेत उमटले असून, भारत चौथ्या स्थानावर घसरला आहे.
लॉर्ड्सवरील पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात, भारताने विजयासाठी शेवटचा झंझावात उडवण्याची तयारी केली होती. रवींद्र जडेजा नाबाद अर्धशतकासह खेळपट्टीवर स्थिर होता, भारताला गरज होती फक्त 30 धावांची आणि दोन विकेट राखलेल्या होत्या. पण इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर अखेर भारतीय संघ 170 धावांवर गारद झाला.
जडेजा शेवटपर्यंत लढत राहिला. त्याने 181 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद खेळी केली, पण दुसऱ्या बाजूने साथीदारांनी साथ सोडल्यामुळे विजय दूरच राहिला.
या पराभवामुळे भारताच्या WTC मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. भारताने आतापर्यंत तीन कसोटीत केवळ एक विजय मिळवला असून त्यांच्या खात्यात फक्त 12 गुण आहेत. गुणांची टक्केवारी 33.33 टक्के झाली असून भारत आता ४थ्या स्थानी पोहोचला आहे.
याउलट, इंग्लंडने या मालिकेत दोन विजय मिळवत 24 गुण मिळवले आहेत आणि त्यांची गुणांची टक्केवारी 66.67 आहे. त्यामुळे इंग्लंडने थेट दुसरे स्थान पटकावले आहे. श्रीलंका देखील 66.67 टक्केवारीसह टॉप-2 मध्ये आहे, पण गुणसंख्या कमी आहे.



