Thane Crime News : ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! घरफोडी करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश

•18 गुन्ह्यांची उकल, गुजरात आणि पुण्यातून आवळल्या मुसक्या
ठाणे | एका रात्रीत एकापाठोपाठ एक पाच ते सहा दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल घरफोड्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाला यश आले आहे. या कारवाईमुळे ठाणे, मुंबई आणि चक्क कोल्हापूरमधील घरफोडीच्या एकूण 18 गुन्ह्यांचा उकल झाली असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
एकाच रात्रीत पाच दुकाने फोडली
नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनिल सखाराम परबळकर यांचे ‘अथर्व मेडिकल शॉप’ आणि इतर पाच दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम आणि मोबाईल लंपास केले होते. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू करून घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या टोळीचा छडा लावला.
गुजरात आणि पुण्यातून आरोपींना उचलले
गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने तपास करत उल्हासनगर, पुणे आणि थेट गुजरातच्या बिलीमोरा येथून आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत.
1) विनयकुमार कृपाशंकर पासवान (वय 21, उल्हासनगर)
2) प्रदीप रामबहादुर निशाद (वय 20, उल्हासनगर)
3) राजवीर संजूसिंग लाहोरी (वय 19, उल्हासनगर – बिलीमोरा येथून अटक)
4) सलमान अली अहमद अली शेख (वय 22, उल्हासनगर – देहुरोड येथून अटक)
चोरीची अनोखी पद्धत
हे आरोपी अत्यंत सराईतपणे गुन्हे करत असत. चोरी करण्यासाठी ते आधी रिक्षा किंवा दुचाकी चोरायचे. त्यानंतर त्याच वाहनांचा वापर करून मध्यरात्री किराणा दुकाने आणि मेडिकल शॉपचे शटर उचकटून घरफोडी करत असत. आरोपींकडून 1 लाख 25 हजार रुपये किमतीचे 6 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
राज्यभर गुन्ह्यांचे जाळे
आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सध्या ही टोळी टिळकनगर पोलिसांच्या कोठडीत असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
तपास पथक
ही यशस्वी कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.


