Sharad Pawar : राज्यात ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याचा निर्णय; शरद पवारांकडून राज्य सरकारवर टीका

Sharad Pawar On Government Of India : “शेतकऱ्यांसाठी मोकळ्या हाताने मदत करण्याची सरकारची दानत नाही”,मराठवाड्यासह राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तोकडी मदत; राष्ट्रवादीकडून आज दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय
पुणे :- राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या प्रचंड शेती नुकसानीनंतरही राज्य सरकार शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्यास तयार नाही. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज राज्यभरात ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मांडली. ते आज (शुक्रवारी) बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
“सरकारचा दृष्टिकोन वेगळा”
शरद पवार म्हणाले की, “मला असे वाटते की, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचा सरकारचा दृष्टीकोन वेगळा आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. आम्ही तशी तयारी राज्य सरकारकडे दाखवली, पण शेतकरी आणि पूरग्रस्तांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची तयारी आतापर्यंत तरी दिसून आलेली नाही.”
राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘काळी दिवाळी’चा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि संघटनेच्या सहकाऱ्यांनी एकत्र बसून आजचा (दिवाळीचा) दिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. याचे कारण स्पष्ट करताना पवार म्हणाले, “गेले महिनाभर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी, पूर आणि महापूर होता. यात शेती उद्ध्वस्त झाली, जमिनी खरडून गेल्या. ज्याचे सर्वस्व वाहून गेले आहे, तो शेतकरी कोणत्या मनस्थितीत दिवाळी साजरी करणार? म्हणून त्याच्या दुःखात आमच्या संघटनेने सहभाग घेण्याचा निर्णय घेतला.”
सरकारने जाहीर केलेली मदत तोकडी असून, नुकसानीचे स्वरूप बघता या रकमेचा उपयोग शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्यासाठी होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारवर संकटग्रस्त शेतकरी नाराज आहे, असेही पवार म्हणाले.
पुरंदर विमानतळावर भाष्य
यावेळी शरद पवार यांनी पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांकडून होत असलेल्या विरोधावरही भाष्य केले.
ते म्हणाले, “विमानतळाला मोबदला हा विषय नाही, तर काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, विमानतळाची जागा बदला. हा निर्णय मी किंवा सरकारी अधिकारी घेऊ शकत नाहीत, हा केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे.”
शेतकऱ्यांची मागणी आणि पुनर्वसन
विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची शेती ताब्यात घेतली जाईल, त्यांच्या पुनर्वसन आणि नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. पवारांनी शेतकऱ्यांच्या भेटीदरम्यान त्यांना सांगितले की, “कोणीही गैर कायद्याने शेतकऱ्यांची जमीन काढू शकत नाही. त्यांना योग्य ती नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन द्यावी, ही त्यांची मागणी होती.”
यावर मार्ग काढण्यासाठी पवार यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे सांगितले. दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईल आणि या विषयावर बोलू, असे आश्वासन त्यांनी दिले.



