E-Challan Issue : राज्यातील वाहतूक संघटनांचा दोन जुलैपासून बेमुदत संपाचा इशारा; सरकारवर जाचक अटींचा आरोप

E-Challan Issue : प्रवासी-मालवाहतूक संघटनांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम; राज्यव्यापी ठप्प आंदोलनाचा इशारा
पुणे | राज्यातील प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी दोन जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. जबरदस्तीने ई-चलन वसुली, नो एन्ट्री क्षेत्रातील जाचक निर्बंध, तक्रार निवारणात होणारा विलंब आणि कामगार भरतीची सक्ती या मुद्द्यांवरून वाहन संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. E-Challan Issue Latest News
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वाहन, चालक, मालक आणि प्रतिनिधी महासंघाच्या नेतृत्वाखाली अलीकडेच विविध संघटनांची संयुक्त बैठक पार पडली. यामध्ये डॉ. बाबा शिंदे, उदय बर्गे, प्रकाश गवळी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सरकारने दहा दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा दोन जुलैपासून संपूर्ण राज्यात वाहतूक ठप्प करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
“सक्तीची ई-चलन वसुली थांबवा, अन्यथा संप अटळ” – डॉ. बाबा शिंदे
महासंघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, आझाद मैदानावर झालेले बेमुदत उपोषण दुर्लक्षित केलं गेलं. शासनाचे दुर्लक्ष, अन्यायकारक अटी आणि दडपशाही यामुळे वाहनधारक, चालक आणि वाहतूक व्यावसायिकांमध्ये असंतोष वाढला आहे.
प्रमुख मागण्या:
- ई-चलन वसुलीला तत्काळ स्थगिती द्यावी.
- ई-चलन संदर्भातील तक्रारींचं वेळेत निराकरण करावं.
- स्वच्छतेसाठी अतिरिक्त कामगार अनिवार्यता अट रद्द करावी.
- “नो एन्ट्री” विभागातील वाहने उभे करण्यावरील निर्बंधांचा पुनर्विचार करावा.
- वाहतूकदारांवरील जाचक अटी हटवाव्यात.



