
Chandrakant Patil On Raj Thackeray : फडणवीस-राज ठाकरे भेटीमुळे चर्चांना उधाण; मनसेच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
सांगली | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या आगामी राजकीय भूमिकेवर प्रचंड सस्पेंस निर्माण झाला आहे. नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात उलथापालथ झाली आहे. यावर भाष्य करताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे की, “राज ठाकरे हे वादळासारखे आहेत, त्यांचा मार्ग कधी आणि कुठे वळेल, हे कोणीही सांगू शकत नाही.”
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत संभाव्य युतीचे संकेत दिले होते, ज्याचे स्वागत स्वतः उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मात्र फडणवीस यांच्याशी झालेली अचानक भेट आणि त्यानंतर निर्माण झालेल्या चर्चा यामुळे मनसेच्या राजकीय धोरणाबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनीही राज ठाकरे – फडणवीस भेटीवर टीका करताना म्हटलं की, “ही भेट म्हणजे फक्त वातावरण निर्मिती आहे. मात्र मुंबई व मराठी माणसाच्या हलाखीची जबाबदारी भाजप व फडणवीस यांच्यावर आहे.”
एकेकाळी पंतप्रधान मोदी यांचे खुले समर्थन करणारे राज ठाकरे यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनसेने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. आता आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांचा पुढील राजकीय डाव काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे



