Navi Mumbai Crime News : ‘बनावट सोन्याचा’ पहिला गुन्हा पचला, पण दुसऱ्या प्रयत्नात रंगेहाथ पकडले!

•एकाच कंपनीत पुन्हा फसवणूक करण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल
नवी मुंबई :- एक गुन्हा पचल्यावर गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक निर्ढावलेले होतात. पण अनेकदा हीच अतिश्रीमती त्यांना महागात पडते. असाच एक प्रकार नवी मुंबईतील ऐरोली येथे समोर आला आहे, जिथे बनावट सोने गहाण ठेवून लाखो रुपये लुटणाऱ्या टोळीचा दुसऱ्या प्रयत्नात पर्दाफाश झाला आहे. एकाच वित्त कंपनीला दोनदा फसवण्याचा प्रयत्न करताना या टोळीतील एका महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
ऐरोली येथील मुथूट फिनकॉर्प या वित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीत 29 जुलै रोजी लक्ष्मण नेमाडे, संतोष ओझा आणि सांची झा या तिघांनी संगनमत करून 19.3 ग्रॅम वजनाची एक सोन्याची बनावट साखळी गहाण ठेवली. या बदल्यात त्यांनी 1 लाख 27 हजार रुपये घेतले होते. हा गुन्हा पचल्यानंतर, त्यांना वाटले की आपण पुन्हा असाच प्रयत्न करू शकतो.
पण 7 ऑगस्ट रोजी, आरोपींपैकी एक महिला, सांची झा, पुन्हा त्याच कंपनीत दोन बनावट सोन्याच्या साखळ्या गहाण ठेवण्यासाठी आली. यावेळी, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीत या साखळ्या खोट्या असल्याचे उघड झाले. त्यानंतर 29 जुलै रोजी गहाण ठेवलेली साखळीही पुन्हा तपासली असता ती देखील बनावट असल्याचे समोर आले.
या प्रकारानंतर कंपनीने तात्काळ रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लक्ष्मण नेमाडे, संतोष ओझा आणि सांची झा यांच्या विरोधात फसवणूक करणे आणि फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या तिन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.


