Raj Thackeray On Dr Jayant Narlikar Death : “‘विज्ञानाला साखरेचं कोटिंग देणारा माणूस गेला’ – राज ठाकरे यांची डॉ. जयंत नारळीकरांना फेसबुकवरून भावनिक श्रद्धांजली”

•बिग बँग थिअरीला आव्हान देणाऱ्या मराठी वैज्ञानिकाचं जाणं म्हणजे एका विचारशील युगाची सांगता – मनसे अध्यक्षांची प्रतिक्रिया
मुंबई :- खगोलशास्त्राच्या आकाशात दीर्घ काळ तेजस्वीपणे प्रकाशमान असलेलं एक तारा आज निखळलं. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात शोकाची लाट आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“विज्ञानाची गोळी कडू लागत असेल तर त्याला साखरेचं कोटिंग म्हणजे कथेचं रूप देणं चांगलं” — या नारळीकरांच्या ओळी उद्धृत करत, ठाकरे यांनी त्यांच्या विज्ञानकथा लेखनाचाही गौरव केला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये 1964 मधील त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून दिली, जेव्हा अवघ्या 26 व्या वर्षी नारळीकरांनी आपल्या गुरु फ्रेड हॉयल यांच्यासोबत गुरुत्वाकर्षणाचा नवा सिद्धांत मांडला. बिग बँग थिअरीला त्या काळात सर्वस्वी मान्यता असतानाही नारळीकरांनी वैज्ञानिक विचारांना आव्हान देण्याचं धाडस केलं आणि विज्ञानात नव्या शक्यतांना चालना दिली.
ठाकरे पुढे लिहितात की, “विज्ञानात एक बरं असतं की एखाद्याने एखादी थिअरी खोडून काढली म्हणून कोणी कोणाच्या अंगावर धावून जात नाही, उलट नव्या प्रेरणेने विचार सुरू होतो. असं राजकारणात कधी होईल कोण जाणे…” या वाक्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे आजच्या विचारशून्य वादांवरही टोला लगावला.
नारळीकरांच्या कार्याची दोन वैशिष्ट्यं विशेषत्वाने अधोरेखित करत, ठाकरे यांनी आयुका (IUCAA) सारख्या संस्थेच्या स्थापनेतील त्यांच्या भूमिकेचा उल्लेख केला. त्या काळात भारतात मूलभूत संशोधन संस्था उभ्या राहत असताना नारळीकरांनी स्वतःहून त्या दिशेने काम केलं, याचं कौतुक करत ठाकरे म्हणतात, “अशी माणसं आणि त्यांनी उभ्या केलेल्या संस्था यांचं अप्रूप वाटतं.”
नारळीकरांच्या कार्याची दोन वैशिष्ट्यं विशेषत्वाने अधोरेखित करत, ठाकरे यांनी आयुका (IUCAA) सारख्या संस्थेच्या स्थापनेतील त्यांच्या भूमिकेचा उल्लेख केला. त्या काळात भारतात मूलभूत संशोधन संस्था उभ्या राहत असताना नारळीकरांनी स्वतःहून त्या दिशेने काम केलं, याचं कौतुक करत ठाकरे म्हणतात, “अशी माणसं आणि त्यांनी उभ्या केलेल्या संस्था यांचं अप्रूप वाटतं.”
त्यांच्या दुसऱ्या पैलूची – विज्ञानकथालेखक या ओळखीची – आठवण करत ठाकरे म्हणतात, “अमेरिकेत व युरोपात विज्ञानकथांचं मोठं प्रस्थ आहे, पण नारळीकरांनी मराठी माणसाला विज्ञानाची गोडी लावली.”
पोस्टच्या अखेरीस ठाकरे म्हणतात,
“अशा माणसांची उणीव नक्की भासेल आणि महाराष्ट्राला तर नक्कीच. डॉ. जयंत नारळीकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली.”


