Cyber Police : सायबर पोलिसांचा ‘डिजिटल अरेस्ट’वर प्रहार! – 114 कोटींच्या महाघोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्रातील 07 जिल्ह्यांतून 13 ‘बँक खातेधारक’ गजाआड!

Mumbai Digital Arrest News : मुंबईत ‘डिजिटल अरेस्ट’चे 142 गुन्हे; फसवणुकीची रक्कम ट्रान्सफर करणारे नागपूर, पुणे, नाशिकमधील आरोपी जेरबंद!
मुंबई :- सायबर गुन्हेगारांनी चालू वर्षात ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) या सायबर फसवणुकीच्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांना तब्बल 114 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या वाढत्या फसवणुकीला लगाम घालण्यासाठी मुंबई प्रादेशिक सायबर पोलिसांनी ‘डिजिटल अरेस्ट’ विरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली असून, याअंतर्गत महाराष्ट्रातील 07 जिल्ह्यांमधून एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ऑपरेशन ‘डिजिटल अरेस्ट’
चालू वर्षात (ऑक्टोबर अखेरपर्यंत) एकट्या मुंबई शहरात “डिजिटल अरेस्ट” या प्रकाराखाली 142 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाली असल्याने, सायबर गुन्हे शाखेने दिनांक 18/11 पासून 13 विशेष पथके तयार केली. या पथकांनी सोलापूर, पुणे, नागपूर, नाशिक, सातारा आणि मुंबई उपनगर यासह 07 जिल्ह्यांमध्ये छापेमारी करून 13 आरोपींना अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे फसवणुकीचे एकूण 08 मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत.
बँक खातेधारकांचा सहभाग उघड
अटक करण्यात आलेल्या बहुतांश आरोपींचा थेट फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग नसला तरी, ते फसवणुकीची रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी बनावट बँक खाती पुरवण्यात सामील होते. अटक आरोपींमध्ये सोलापूर, जुन्नर (पुणे), विरार, नालासोपारा, जोगेश्वरी (मुंबई), नागपूर, खंडाळा (सातारा) आणि नाशिक येथील बँक खातेधारकांचा समावेश आहे. काही आरोपींनी आपले बँक खाते पैसे ट्रान्सफर करण्यासाठी दुसऱ्यांना वापरण्यास दिले होते.
यातील एका गुन्ह्यात आरोपी जयेश जव्हेरीने त्याचे खाते घुमील राम्बीयाला, तर दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी विलास मारे (रेहान खान) याने खाते रिझवान खान आणि कासीम शेख यांना वापरण्यास देऊन ‘चेन सिस्टीम’ कार्यरत ठेवली होती. यामुळे फसवणुकीची रक्कम एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात वळवून ती सुरक्षित करण्याचा गुन्हेगारांचा प्रयत्न उधळला गेला आहे.
पोलीस आयुक्त देवेन भारती आणि पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.


