Ajit Pawar : ‘पाणी ओसरू द्या, सरकार सर्वतोपरी मदत करेल’; अजित पवारांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट

Ajit Pawar Solapur Visit : मराठवाड्यात अतिवृष्टीचा फटका, सीना नदीवरील बंधारे तुडुंब, बोट पंक्चर झाल्याने उपमुख्यमंत्र्यांची अडचण
सोलापूर :- मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसलेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या फटक्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे तातडीने मदतीची मागणी केली. यावर बोलताना अजित पवार Ajit Pawar यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. ‘पाणी ओसरू द्या, किती रान वाहून गेलं आहे ते पाहू द्या. ज्यांची जमीन खरडून गेली आहे, त्या सर्वांना सरकार निश्चितपणे मदत करेल,’ असे आश्वासन त्यांनी दिले.



सीना नदीच्या पुराचा मोठा फटका
दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी सांगितले की, सीना नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे. सीना नदीवरील बंधाऱ्यावरून 17 ते 18 हजार क्युसेक क्षमतेने पाणी वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पूरग्रस्तांपर्यंत दूध, भाजीपाला आणि इतर मदत पोहोचवली जात असून, शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचीही व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
पुरामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असल्याचा अनुभवही उपमुख्यमंत्र्यांना आला. ‘मला नदीच्या पलीकडे जायचे होते, पण माझी बोट पंक्चर झाली आणि ट्रॅक्टर मागवला तोही बंद पडला,’ असे त्यांनी सांगितले.
पंचनामे करून तात्काळ मदत
अजित पवार यांनी सांगितले की, पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त भागांचे पंचनामे वेगाने होतील. ‘कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही,’ असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून, प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना आणखी मदत दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.


