
Thackeray Family Latest News : मकर संक्रांतीच्या दिवशी ठाकरे बंधूंची गळाभेट; शिवतीर्थावर प्रतिनिधींना राज ठाकरेंचा ‘विजयी’ कानमंत्र, तर शर्मिला ठाकरेंकडून तिळगुळाचे वाटप
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना, मुंबईच्या राजकीय इतिहासात अनेक वर्षांनी एक दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले. मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मुंबईची आराध्य दैवत आई मुंबादेवीचे दर्शन घेतले. मतदानापूर्वीचे हे दर्शन केवळ धार्मिक नसून, ‘ठाकरे ब्रँड’ची ताकद दाखवणारे असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



शिवतीर्थावर ‘फायनल’ रणनीती
बुधवारी (14 जानेवारी) सकाळी राज ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक घेतली. उद्या होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांची भूमिका कशी असावी, ईव्हीएमवर लक्ष कसे ठेवावे आणि प्रत्येक मतदाराला घराबाहेर कसे काढावे, याबाबत त्यांनी ‘मायक्रो’ नियोजन केले. “उद्याचा दिवस आपला आहे, शेवटच्या क्षणापर्यंत सतर्क राहा,” असा विजयाचा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला.
तिळगुळ आणि स्नेह: मातोश्री ते शिवतीर्थ
याच दरम्यान, उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह मातोश्रीवरून शिवतीर्थावर पोहोचले. तिथे दोन्ही कुटुंबांनी एकत्र वेळ घालवला. शर्मिला ठाकरे यांनी शिवतीर्थावर जमलेल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना “तिळगुळ घ्या, गोड बोला” म्हणत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच गाडीतून मुंबादेवी मंदिराकडे रवाना झाले, तर रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि कुटुंबातील इतर सदस्य दुसऱ्या गाडीतून सोबत होते.
मुंबादेवी चरणी विजयाची प्रार्थना
मुंबई नगरीची रक्षणकर्ती म्हणून मुंबादेवीच्या मंदिरात ठाकरे बंधूंनी अभिषेक आणि आरती केली. 15 जानेवारीच्या निवडणुकीत मुंबईवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी आणि युतीला यश मिळण्यासाठी त्यांनी साकडे घातले. विशेष म्हणजे, संजय राऊत हे देखील राज ठाकरे यांच्यासोबत एकाच गाडीत बसून दर्शनासाठी गेल्याने, दोन्ही पक्षांमधील समन्वय आणि मैत्रीची नवीन चर्चा सुरू झाली आहे.
मतदारांना जागरूक राहण्याचे आवाहन
दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी ईव्हीएममधील संभाव्य गडबडींबाबत पुन्हा एकदा मतदारांना सावध केले. “प्रत्येक मतदाराने आपण दिलेले मत योग्य ठिकाणी पडले आहे की नाही, हे तपासावे. लोकशाहीचा हा उत्सव पारदर्शकपणे पार पाडण्याची जबाबदारी आता जनतेवर आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.


