Kalyan News : मामा पगारे यांना साडी नेसवल्याने राजकीय वातावरण तापले; भाजपच्या दडपशाहीचा काँग्रेसचा आरोप

Kalyan Latest News : पंतप्रधानांच्या प्रतिमेमुळे भाजप पदाधिकारी आक्रमक; 72 वर्षीय नेत्याला रस्त्यात गाठले
कल्याण :- डोंबिवली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडीच्या वेशातील प्रतिमेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने ही प्रतिमा समाज माध्यमांवर प्रसारित केल्याने संतप्त झालेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी 72 वर्षीय काँग्रेस नेते मामा पगारे यांना भर रस्त्यात गाठून त्यांना साडी नेसवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे मानसिक धक्का बसलेल्या मामा पगारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
मामा पगारे यांनी समाज माध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साडीतील प्रतिमा प्रसारित केल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला होता. यावरून संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी, त्यात भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा समावेश असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे, मामा पगारे यांना भर रस्त्यात गाठले. त्यांच्या स्वच्छ पांढऱ्या शुभ्र सदऱ्यावर त्यांनी नवा कोरा शालू नेसवला.
या प्रकारानंतर, मामा पगारे पोलीस कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना मानसिक धक्क्याने जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले.
भाजपवर दडपशाहीचा आरोप
या घटनेवरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी म्हटले आहे की, “हा प्रकार भाजपची दडपशाही आणि हुकूमशाही वृत्ती दर्शवतो. एवढी साडीची भीती भाजप नेत्यांना वाटते तर त्यांनी तसे वागू नये.”
या गैरवर्तनाविरुद्ध काँग्रेसने आता कठोर भूमिका घेतली आहे. गुरुवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्याचबरोबर, भाजप पदाधिकाऱ्यांना सुबुद्धी मिळावी यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुर्गाडी किल्ला येथे जाऊन दुर्गा देवीला साडी अर्पण केली.


