ठाणे

Swiggy Zomato Strike : ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्टीवर संपाचे सावट! झोमॅटो-स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजचा देशव्यापी एल्गार; ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांची होणार मोठी फजिती

Zomato Swiggy Latest Strike News : ’10 मिनिटांच्या डिलिव्हरी’चा जीवघेणा अट्टाहास नडला; किमान वेतनासह 10 मागण्यांसाठी ‘गिग वर्कर्स’ मैदानात, आज जेवण मिळणे होणार कठीण

मुंबई | नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घरीच बसून लज्जतदार जेवणावर ताव मारण्याची तयारी करणाऱ्या खवय्यांसाठी एक अतिशय वाईट बातमी आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट आणि झेप्टो यांसारख्या प्रमुख प्लॅटफॉर्मवरील लाखो डिलिव्हरी पार्टनर्सनी आज, 31 डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. वर्षातील सर्वात मोठ्या व्यवसायाच्या दिवशीच ‘गिग वर्कर्स’नी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा पूर्णपणे कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.

जीवघेण्या ‘डिलिव्हरी मॉडेल’विरुद्ध संतापाचा उद्रेक

या संपाच्या केंद्रस्थानी कंपन्यांचे ’10 मिनिटे डिलिव्हरी’ मॉडेल आहे. अवघ्या दहा मिनिटांत सामान पोहोचवण्याच्या नादात डिलिव्हरी बॉईजचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. “कंपन्यांच्या नफेखोरीसाठी आम्ही आमचा जीव धोक्यात घालणार नाही,” अशी आक्रमक भूमिका ‘इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स’ने घेतली आहे. ख्रिसमसच्या दिवशी झालेल्या प्रतीकात्मक संपानंतरही कंपन्यांना जाग आली नसल्याने, आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी पूर्ण ताकदीने हा लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

किमान 24 हजार वेतन आणि ‘कामगार’ दर्जाची मागणी

डिलिव्हरी पार्टनर्सनी केवळ वेळेच्या विरोधातच नव्हे, तर आपल्या आर्थिक हक्कांसाठीही सरकारचे दार ठोठावले आहे. केंद्रीय कामगार मंत्र्यांना पाठवलेल्या 10 कलमी मागणी पत्रात त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. यामध्ये डिलिव्हरी बॉईजला ‘भागीदार’ म्हणण्याऐवजी ‘कामगार’ म्हणून कायदेशीर दर्जा मिळावा, अशी प्रमुख मागणी आहे. याशिवाय दरमहा किमान 24,000 रुपये उत्पन्न, राईड-हेलिंग ड्रायव्हर्ससाठी प्रति किलोमीटर 20 रुपये दर आणि अपघाती विम्यासह सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी हे कामगार आग्रही आहेत.

कोट्यवधींची उलाढाल ठप्प; ग्राहकांचा हिरमोड होणार

31 डिसेंबर हा दिवस डिलिव्हरी कंपन्यांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मानला जातो. या एका रात्रीत कोट्यवधी रुपयांच्या ऑर्डर्सची नोंद होत असते. मात्र, आजच्या संपामुळे या कंपन्यांच्या तिजोरीला मोठे भगदाड पडणार आहे. दुसरीकडे, जे ग्राहक शेवटच्या क्षणी ॲपवरून जेवण किंवा शीतपेये मागवणार आहेत, त्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागेल किंवा त्यांची ऑर्डर थेट रद्द केली जाण्याची शक्यता आहे. डिलिव्हरी बॉय उपलब्ध नसल्याने अनेक रेस्टॉरंट्सनी आधीच आपले ऑनलाईन बुकिंग बंद करण्यास सुरुवात केली आहे.

आजची रात्र ‘स्वयंपाका’ची किंवा ‘बाहेर’ जाण्याची!

जर तुम्ही पार्टीसाठी ऑनलाईन डिलिव्हरीवर अवलंबून असाल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. संपाच्या प्रभावामुळे दिल्ली, मुंबई, पुणे आणि बेंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये डिलिव्हरीमध्ये प्रचंड विलंब होणार आहे. त्यामुळे शक्य असल्यास स्वतः हॉटेलमध्ये जाऊन पार्सल आणणे किंवा घरूनच खाण्यापिण्याची सोय करणे हाच आजच्या रात्रीसाठी शहाणपणाचा निर्णय ठरेल.

vivek

Recent Posts