पुणे

Bank Fraud Pune : पुण्यात बँकेची 11 कोटींची फसवणूक; खोट्या ‘एनओसी’चा वापर

सुवर्णयुग सहकारी बँकेला चुना : चौघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे :- बनावट नाहरकत दाखला बॅंकेत सादर करुन तब्बल ११ कोटींचा फसवणूकीचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील एका खासगी बँकेचे बनावट ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) वापरून बँकेची तब्बल 11 कोटी 47 लाख 83 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 30 जानेवारी 2018 ते 10 एप्रिल 2023 या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, आर्थिक गुन्हे शाखेकडे फिर्यादी कौशिक सुरेश पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, मे. रोहित सर्व्हिस स्टेशन, माणिक बिहाणी (वय 64), सतीश भुतडा (वय 62) आणि रोहित बिहाणी (वय 42) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फर्ग्युसन रस्त्यावरील एचडीएफसी बँकेचे HDFC Bank बनावट ‘एनओसी’ नाहरकत तयार केले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी सुवर्णयुग सहकारी बँकेकडून Suvarnayug Cooperative Bank पाच कोटींहून अधिक रकमेचे कर्ज मिळवले. कर्ज मिळाल्यानंतर आरोपींनी त्याची परतफेड केली नाही. 11 कोटी 47 लाख 83 हजार 688 रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. या घटनेमुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे होणाऱ्या फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

vivek

Recent Posts