
Sushma Andhare On Ajit Pawar: प्रतिबंधित विमान वापरासाठी का दिले? उडान नियामक मंडळाकडे अंधारेंची चौकशीची मागणी; हक्कभंग नोटीसवरही व्यक्त केली प्रतिक्रिया
सोलापूर | जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी सोलापूर दौऱ्यात सत्ताधारी महायुतीवर तोफ डागली आहे. “अजित पवार ही राज्याची मोठी संपत्ती होती, त्यांच्या अपघाती निधनाबाबत महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला प्रश्न विचारण्याचा हक्क आहे,” असे म्हणत त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक अनुत्तरीत प्रश्न उपस्थित केले आणि हा ‘घातपात’ असल्याचा संशय व्यक्त केला.
विमान अपघातावरून सरकारला धारेवर धरले
सुषमा अंधारे यांनी विमान अपघाताच्या तांत्रिक बाबींवर बोट ठेवताना गंभीर आरोप केले. “ज्या विमानावर आंतरराष्ट्रीय उडान नियामक मंडळाने (ICAO/DGCA) वर्षभरापूर्वीच बंदी घातली होती, तेच विमान अजित पवारांच्या प्रवासासाठी का वापरले गेले? स्वतःच्या सुरक्षेबाबत कमालीचे जागरूक असणारे अजितदादा अशा विमानातून प्रवास कसा काय करतील?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या अपघाताचे नेमके सत्य समोर येण्यासाठी भाजपने उत्तरे देणे टाळू नये, असेही त्या म्हणाल्या.
पालकमंत्री जयकुमार गोरेंना टोला
प्रचार सभेत बोलताना त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही लक्ष्य केले. “पालकमंत्री जर पंचायत समितीच्या उमेदवारांच्या सभा घेत असतील, तर आता ते गावच्या गणपती मंडळाच्या अध्यक्ष निवडीसाठीही बैठका घेणार आहेत का?” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कारभारावरही त्यांनी सडकून टीका केली.
हक्कभंग समितीची नोटीस: उद्या हजर राहणार?
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने बनवलेल्या विडंबनात्मक गाण्याला समर्थन दिल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांना विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीने नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची बैठक 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली असून, अंधारे यांना गुरुवारी (5 फेब्रुवारी) दुपारी 2 वाजता समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सुनावणीला त्या हजर राहतात की पुन्हा वेळ मागून घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



