सूरज चव्हाण मारहाण प्रकरण: अजित पवारांकडून दोन दिवसांची ‘मुदत’, कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ‘छावा’संघटनेचा इशारा!

Manikrao Kokate Latest News : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा जळगाव दौरा अचानक रद्द, वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दांडी
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूरज चव्हाण Suraj Chavan यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना घाटगे यांनी सांगितले की, “जे घडले ते अत्यंत चुकीचे झाले, महाराष्ट्राच्या राजकारणात असे व्हायला नको,” असे दादांनी म्हटले आहे. आरोपींवर किरकोळ गुन्हे दाखल करणे आणि काही जणांना सोडून देणे यावर अजित पवार यांनी लातूर पोलिसांशी स्वतः बोलून हे खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट सांगितल्याचे घाटगे म्हणाले. Pune Latest News
अजितदादांनी या प्रकरणी कारवाईसाठी दोन दिवसांची वेळ मागितली असून, त्यानंतरही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा विजय घाटगे यांनी दिला आहे. “मी लातूरला जाऊन एसपींना भेटणार आहे. माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हाकलून द्यावी, अशी आमची मागणी आहे,” असे घाटगे म्हणाले. मंगळवारपर्यंत वाट पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवारांना भेटून “तुमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला का मारले? आमचे काय चुकले?” असा थेट सवाल विचारल्याचेही घाटगे यांनी सांगितले. घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे अजितदादांनी मान्य केले असून, सूरज चव्हाण या व्यक्तीला पुन्हा पक्षात घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती विजय घाटगे यांनी दिली. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास थेट अजित पवारांच्या दारात आंदोलन करण्याचा इशाराही घाटगे यांनी दिला आहे.
कृषीमंत्री कोकाटे यांचा जळगाव दौरा रद्द
दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आजचा जळगाव जिल्ह्याचा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. कोकाटे आज जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, कोणतीही कारणमीमांसा न देता त्यांनी आपला जळगाव जिल्हा दौरा रद्द करून ते थेट नंदुरबारकडे रवाना झाले. यामुळे कार्यकर्ते आणि आयोजकांचा मात्र हिरमोड झाला असल्याचे आयोजक सुनील पाटील यांनी सांगितले.



