पुणे

Supriya Sule : “आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला, यात राजकारण नको!”; अजितदादांच्या अपघातावर सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका

विलिनीकरणाच्या प्रश्नावर जोडले हात; तटकरे-पटेल यांच्या ‘आडकाठी’वर ‘रामकृष्ण हरी’ म्हणत साधले अचूक टायमिंग

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीची आग्रही मागणी केली. यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे समर्थन केले, मात्र पक्ष विलिनीकरणाच्या वादावर आणि पक्षांतर्गत नेत्यांच्या भूमिकेवर सूचक मौन पाळत ‘रामकृष्ण हरी’ म्हणत काढता पाय घेतला.

रोहितची अस्वस्थता सहाजिकच – सुप्रिया सुळे

रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या ‘घातपाता’च्या शंकेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “रोहितची अस्वस्थता ही सहाजिक आहे. घरातील कर्ता पुरुष अशा प्रकारे जाणे हे मोठे दुःख आहे. रोहित अभ्यासपूर्वक या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे आणि सत्य बाहेर यावे हीच संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे. ब्लॅक बॉक्सबाबत तांत्रिक माहिती समोर येईलच, यात शंका नाही.”

‘रामकृष्ण हरी’ म्हणत प्रश्न टोलवला

पत्रकार परिषदेत जेव्हा पत्रकारांनी विचारले की, “राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे आडकाठी आणत आहेत का?” या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी कोणतीही टीका न करता थेट हात जोडले आणि “रामकृष्ण हरी” असे म्हटले. त्यांच्या या ‘अचूक टायमिंग’ची आणि शांतपणे दिलेल्या प्रतिसादाची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

विलीनीकरणावर भावनिक उत्तर

“आज माझा भाऊ (अजितदादा) आपल्यात नाही. तो इतका मोकळ्या मनाचा होता की पत्रकारांशीही ऑफ द रेकॉर्ड मोकळेपणाने बोलायचा. आता त्याच्या पश्चात कोणाबद्दल उणीदुणी काढायची? जे सत्य आहे ते सर्वांनाच ठाऊक आहे. आता कामाला लागणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे सांगत त्यांनी विलीनीकरणाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

घातपाताच्या संशयावर स्पष्टीकरण

विमान अपघाताबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “दररोज नवीन माहिती समोर येत असल्याने लोकांच्या मनात शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. म्हणूनच आम्ही चौकशीची आणि डेटाची मागणी करत आहोत. आम्हाला यात राजकारण करायचे नाही, पण माणुसकीच्या नात्याने या अपघाताचे नेमके कारण समोर यायला हवे. आम्ही सध्या भावनिक धक्क्यात आहोत, पण लोकांची कामे थांबवता येणार नाहीत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0