Supriya Sule : वाघ नख खरी का खोटी, याचा सरकारने खुलासा करावा ; खासदार सुप्रिया सुळे
•वाघ नखांसाठी सरकारने प्रयत्न केले त्याचे कौतुक आहे परंतु इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी वाघनख खोटे असल्याचा दावा केलाय त्यावर सप्रिया सुळे यांचा भाष्य
पुणे :- छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक वाघनखे गुरुवारी साताऱ्यात आणली आहे. ही वाघ नखे लंडनून मुंबईला आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज वाघनखाचे साताऱ्यात दुपारी 12.15 वा. उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच, नागरिकांना पाहण्यासाठी शनिवारीपासून प्रदर्शन होणार आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. ती वाघनखे खरी की खोटे, याचा खुलासा सरकारने करावा, कारण इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी ही वाघ नखे खोटे असल्याचा दावा केला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुका समोर ठेऊन… दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की, “खुप अपेक्षेने लोक ही वाघनखे पाहण्यासाठी जाणार आहेत. लहान मुले, अनेक लोक इथे जाणार आहेत. त्याशिवाय शाळेतील मुलांना ही वाघनखे पाहता यावीत, यासाठी वेगळा वेळही ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जर का मुलांना ही वाघनखे पाहता येणार असतील, तर सरकारने याबाबतचा खुलासा करावा. कारण जर का मुलांना खोटी वाघनखे दाखवण्यात येणार असतील, त्याचा मुलांवर काय परिणाम होईल?”, असा प्रश्न खासदार सुळेंनी उपस्थित केला आहे. तसेच, विधानसभा निवडणुका समोर ठेऊन काही तरी असे करण्यापेक्षा खरा इतिहास समोर सांगावा, असेही त्या म्हणाल्या आहेत.
काय म्हणाले होते इंद्रजीत सावंत?
दरम्यान, इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी लंडनहून येणारी वाघनखे खरे नसल्याचा दावा केला आहे. त्यांना तसे पत्र लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडून आले आहे. महाराष्ट्रात आणण्यात आलेवी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही पुरावा लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडे नाही, असे या म्युझियमकडून आलेल्या पत्रातून म्हटले आहे, असे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.