Supriya Sule : हुंडाबळीचं ग्रहण! सुप्रिया सुळेंचं हगवणे प्रकरणावर हृदयद्रावक भाष्य: “असा महाराष्ट्र नको!”

Supriya Sule Latest News : हुंडाबळीमुक्त महाराष्ट्रासाठी ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्ष कटिबद्ध, राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा
पुणे :- पुण्यातील मुळशी येथे घडलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राला स्तब्ध केले आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून झालेल्या छळाला कंटाळून वैष्णवीने आपले जीवन संपवल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या हगवणे कुटुंबाचे नाव जोडले गेल्याने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी बालगंधर्व रंगमंदिर येथील मेळाव्यात बोलताना या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात हगवणे कुटुंबाशी असलेल्या जुन्या ओळखीचा संदर्भ दिला. त्या म्हणाल्या, “हगवणे कुटुंब हे सुसंस्कृत आणि काँग्रेसच्या विचारांचे होते. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखते. माझ्या लोकसभा मतदारसंघात तीन निवडणुकांमध्ये त्यांनी माझ्यासाठी काम केले आहे. हे कुटुंब पाच दशकांहून अधिक काळ शरद पवारांबरोबर आहे. हे एक शिकलेले कुटुंब आहे, पण आज त्यांची सून हुंड्यामुळे आत्महत्या करते, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.” या घटनेने आपल्याला “असा महाराष्ट्र नको” अशी वेदनादायी भावना त्यांनी व्यक्त केली.
सामाजिक सुधारणांची गरज अधोरेखित करत सुळे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामाजिक बदल घडवून आणण्याचे आवाहन केले. “राज्याची स्थिती खूप गंभीर आहे आणि हगवणे प्रकरण हे त्याचेच एक उदाहरण आहे,” असे त्या म्हणाल्या. केवळ सत्तेत येणे हे आपले ध्येय नसून, हुंडामुक्त महाराष्ट्र घडवणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले. या संदर्भात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष पूर्ण ताकदीने सामाजिक प्रश्नांसाठी काम करेल आणि यासाठी आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी घोषित केले. या घटनेने राजकीय वर्तुळातून सामाजिक सुधारणांच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे.



