Mumbai Crime News : मुंबईत खळबळजनक घटना! नेव्हीच्या संवेदनशील भागातून इन्सास रायफलची चोरी; आरोपी तेलंगणामधून जेरबंद

Mumbai Latest Crime News : चोरीला गेलेली रायफल आणि 40 जिवंत राऊंड जप्त; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
मुंबई :- मुंबईत एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक घटना घडली आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी, नेव्हीच्या संवेदनशील आणि प्रतिबंधित क्षेत्रातून एका अज्ञात व्यक्तीने इन्सास रायफल आणि 40 जिवंत राऊंडची चोरी केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुंबई गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू करत अवघ्या काही दिवसांतच आरोपींना तेलंगणा राज्यातून अटक केली आहे.
नेमके काय घडले?
6 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.50 च्या सुमारास, गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी नेव्ही नगर, कफ परेड येथे एक जवान कर्तव्यावर होता. यावेळी एका अनोळखी इसमाने त्याच्या जवळ येऊन आपण ‘QRT डिपार्टमेंट’मधून आलो आहोत असे सांगितले. त्याने मोठ्या शिताफीने जवानाकडील इन्सास रायफल, दोन मॅगझीन आणि 40 जिवंत राऊंड स्वतःकडे घेतले आणि जवानाला ‘तुझी ड्युटी संपली आहे’ असे सांगून हॉस्टेलला पाठवले.
गणपती विसर्जनाच्या गर्दीचा फायदा घेत फसवणूक, पोलिसांकडून तात्काळ तपास सुरू
जवान हॉस्टेलला जात असताना त्याला आपली चूक लक्षात आली आणि तो परत घटनास्थळी आला. मात्र, तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. यानंतर जवानाने तात्काळ घटनेची तक्रार केली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेने लावला शोध
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा तात्काळ गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक आणि गोपनीय तपास सुरू केला. या तपासणीदरम्यान, आरोपी तेलंगणातील आसिफाबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस पथक तात्काळ आसिफाबादला रवाना झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी चोरीला गेलेली इन्सास रायफल आणि 40 जिवंत राऊंड यशस्वीपणे हस्तगत केली आहे.
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली आहे. ‘सदरक्षणाय खलनिग्रहाणाय’ हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या मुंबई पोलिसांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.



