Narayan Rane : ‘बाप’ वादावर राणेंचा पलटवार! नारायण राणेंनी केली मुलाची कानउघाडणी

•मुख्यमंत्री सेवक, बाप नाही,नारायण राणेंनी स्पष्ट भूमिका घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
मुंबई | राजकारणातील वक्तव्यांची मर्यादा कुठे असावी, यावर पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. धाराशिव येथील एका कार्यक्रमात मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या ‘मुख्यमंत्री म्हणजे सगळ्यांचे बाप’ या वादग्रस्त विधानावर आता स्वतः त्यांच्या वडिलांनी – माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“मुख्यमंत्री कोणाच्याही ‘बाप’ नाहीत, ते लोकांचे सेवक आहेत,” असं म्हणत नारायण राणेंनी नितेशच्या विधानाचा समाचार घेतला. “मी त्याला समजावलं आहे. आता कोणताही वाद उरलेला नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केलं.
‘भाषणात जबाबदारी हवी’ – निलेश राणे व देवेंद्र फडणवीस यांची नितेश राणेंना संयमाची साद
दरम्यान, नितेश राणे यांचे भाऊ व शिंदे गटाचे नेते आमदार निलेश राणे यांनी देखील ट्विटरवरून संयमित भाषेची गरज अधोरेखित करत लिहिले, “बैठकीत बोलणं सोपं असतं, पण कोणत्या विधानाने कुणाचा फायदा होतो याचाही विचार हवा. आपण महायुतीचा भाग आहोत हे विसरू नये.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विधानाला अयोग्य ठरवत, “कोणाच्याही बापाविषयी असं बोलणं गैर आहे. अशा विधानांपासून टाळावं,” असा सल्ला दिला.मिळालेल्या दिलेल्या माहितीनुसार, हा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीतही उपस्थित करण्यात आला आणि त्यावर काही नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली.


