Pune News : तुरुंगातून थेट निवडणूक आखाड्यात! बंडू आंदेकरांसह भावजय आणि सुनेला उमेदवारी अर्ज भरण्यास कोर्टाची परवानगी

Pune Political Latest News : विशाल मिरवणूक, भाषण आणि घोषणाबाजीवर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात भरणार अर्ज
पुणे | पुण्यातील नाना पेठेत गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणूक लढवण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. आज (शनिवार, 27 डिसेंबर) हे तिघेही कडक पोलीस बंदोबस्तात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
‘निवडणूक लढवणे हा अधिकार’न्यायालयाने अटी केल्या मान्य
निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत, विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपींना अर्ज भरण्यास मुभा दिली. आंदेकर यांच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार, आज या आरोपींना तुरुंगातून बाहेर आणून सशुल्क पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालयात नेले जाईल. मात्र, न्यायालयाने काही कडक अटी घातल्या आहेत.मिरवणूक काढण्यास सक्त मनाई अर्ज भरण्यासाठी जाताना कोणतीही शक्तीप्रदर्शन किंवा मिरवणूक काढता येणार नाही.
भाषण आणि घोषणाबाजी नको
सार्वजनिक ठिकाणी भाषण करणे, घोषणा देणे किंवा प्रचार यात्रा काढण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे.नाना पेठेतील टोळीयुद्धाचा पार्श्वभूमी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी नाना पेठेत वर्चस्वाच्या वादातून आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात बंडू आंदेकर आणि त्याचे कुटुंबीय सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. बंडू आंदेकर याला नुकतेच धुळे कारागृहातून ताब्यात घेऊन समर्थ पोलिसांनी पुन्हा अटक केली होती.
राजकीय वर्तुळात चर्चा
तुरुंगात असतानाही आंदेकर कुटुंबाने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने नाना पेठेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. ‘पक्षादेशानुसार उमेदवारी अर्ज भरायचे आहेत’, असे आंदेकर यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितल्याने, हे आरोपी नेमक्या कोणत्या पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवणार, याकडे आता संपूर्ण पुणे शहराचे लक्ष लागले आहे.



